Best News Portal Development Company In India

धाराशिव एलसीबीची धडक कारवाई: ४ चोरीच्या मोटारसायकलींसह सराईत चोरटा जाळ्यात, १.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त!

धाराशिव एलसीबीची धडक कारवाई: ४ चोरीच्या मोटारसायकलींसह सराईत चोरटा जाळ्यात, १.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त!
​तुळजापूर प्रतिनिधी;-
जिल्ह्यात घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक मोहीम उघडली आहे. धाराशिव शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातून गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत एलसीबीच्या पथकाने ४ चोरीच्या मोटारसायकलींसह एका सराईत चोरट्याला रंगेहात ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या आदेशानुसार २४ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व त्यांचे पथक गस्तीवर होते. गस्तीदरम्यान पथकाला अण्णाभाऊ साठे चौकात एक इसम चोरीची मोटारसायकल घेऊन थांबल्याची गोपनीय बातमी मिळाली. पथकाने तत्काळ सापळा रचून सदर इसमाला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव परमेश्वर उर्फ सुरेश चंदर काळे (वय ४०, रा. जुना बस डेपो जवळ, पारधी पिढी, धाराशिव) असे आहे. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने इतर मोटारसायकली लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी दर्शवलेल्या जागेवरून १,८५,००० रुपये मूल्याच्या एकूण ४ मोटारसायकली हस्तगत केल्या.
​विविध पोलीस ठाण्यांतील गुन्हे उघडकीस
गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता सदर मोटारसायकली खालील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे समोर आले आहे:
​आनंदनगर पोलीस ठाणे (धाराशिव)
​धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे
​औसा पोलीस ठाणे (जि. लातूर)
​कर्जत पोलीस ठाणे (जि. अहिल्यानगर)
​आरोपीसह जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी आनंदनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि अमोल मोरे, पोहेका समाधान वाघमारे, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, मपोह शोभा बांगर, चालक पोलीस कर्मचारी दहिहांडे व शेरखाने यांच्या पथकाने केली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india