Best News Portal Development Company In India

सावरगावातील धार्मिक व सामाजिक कार्यात कमल मावशी गवळी ठरणार्या ‘आधारवड’!

सावरगावातील धार्मिक व सामाजिक कार्यात कमल मावशी गवळी ठरणार्या ‘आधारवड’!
​तुळजापूर प्रतिनिधी :-
तालुक्यातील सावरगाव येथे वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडतात. या कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनात गावातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि दातृत्व तरुणांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत असून, यामध्ये कमल मावशी गवळी यांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरत आहे.
​कमल मावशींचे माहेर सावरगावातीलच काळदाते घराणे असून सासर गवळी घराणे आहे. त्यांचे पती स्व. पांडुरंग भाऊ हे गावातील नामांकित पैलवान, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून व्यायाम करावा, तंदुरुस्त राहावे आणि माता-पित्याची सेवा करावी, हा त्यांचा संदेश आणि स्वस्त धान्य दुकानदार म्हणून त्यांनी दिलेले योगदान आजही स्मरणात आहे. त्यांच्या विचारांचा व सेवाभावाचा हा वारसा कमल मावशी पुढे चालवत आहेत.
​धार्मिक जीर्णोद्धार आणि अन्नदानात मोलाचा वाटा
केवळ मार्गदर्शनच नव्हे, तर कमल मावशींनी गावासह परिसरात मोठ्या औदार्याने आर्थिक मदतीचा हात दिला आहे.
​मंदिर जीर्णोद्धार व देणगी- सावरगावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि मारुती मंदिराच्या शिखराचा जीर्णोद्धार करून पालखी अर्पण केली. याशिवाय चावडीतील दगडी गणपती मंदिर आणि धामणगाव येथील बोधले महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मोलाचे आर्थिक सहकार्य केले.
​अन्नदान व सप्ताह सेवा- एकनाथ महाराज मंदिरातील सप्ताह, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सप्ताहातील अन्नदान आणि श्री नागनाथ महाराज देवस्थानातील अन्नदान सेवा अशा विविध उपक्रमांत सतत योगदान दिले आहे.
​गावात धार्मिक कार्यात कोणतीही अडचण आल्यास मार्गदर्शनासाठी पुढे येणे आणि सढळ हाताने मदत करणे, ही कमल मावशींची ओळख बनली आहे. जुन्या आणि नव्या पिढीला एकत्र आणून संस्कृतीचा वारसा जपणार्‍या कमल मावशी गवळी खऱ्या अर्थाने सावरगावच्या धार्मिक व सामाजिक वाटचालीत ‘आधारवड’ ठरत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india