भूम पोलिसांची अवैध दारू धंद्यांवर सर्जिकल स्ट्राइक; एकाच वेळी १० ठिकाणी ‘मास रेड’, हजारो रुपयांचा ऐवज नष्ट!
तुळजापूर प्रतिनिधी:-
तालुक्यातील अवैध दारू विक्री व हातभट्ट्यांवर भूम पोलिसांनी मोठी कारवाई करत धडक ‘मास रेड’ (विशेष मोहीम) राबवली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरसोली, दिंडोरीसह भूम शहरातील इंदिरानगर आणि कल्याणनगर पारधी पिढी या परिसरांमध्ये एकाच वेळी १० ठिकाणी छापा टाकून तब्बल ८७५ लिटरचा ऐवज जागीच नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे दाबे दणाणले आहेत.
जप्त व नष्ट केलेल्या मुद्देमालाचा तपशील-
गावठी हातभट्टी दारू: २७५ लिटर (किंमत ₹२७,५००/-)
दारू तयार करण्याचे सडवा रसायन: ६०० लिटर (किंमत ₹४८,०००/-)
एकूण नष्ट केलेला मुद्देमाल: ८७५ लिटर (एकूण किंमत ₹७५,५००/-)
या धडक कारवाईत एकूण १० आरोपींवर कडक कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी श्री. अमोल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय खांडे आणि पीएसआय बर्डे यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल कवडे (बॅ. क्र. १५४७), महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मुल्ला (बॅ. क्र. १२३१), पोलीस अंमलदार कलाल (बॅ. क्र. ८९०), कवडे (बॅ. क्र. ५०३), कोरे (बॅ. क्र. ३८७), जाधव (बॅ. क्र. १६१४) व भूम पोलीस ठाण्याचा इतर स्टाफ सहभागी होता.
“भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री, उत्पादने व इतर अवैध धंद्यांवर यापुढेही अशीच सातत्याने कडक कारवाई सुरू राहील. अवैध व्यवसायात सहभागी असणाऱ्यांची गय केली जाणार नसून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”







