पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश: श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘माझा वाढदिवस – माझे झाड’ उपक्रम सुरू!
तुळजापूर प्रतिनिधी:-
येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत दि. २७ ऑगस्ट रोजी एका अभिनव आणि स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ‘माझा वाढदिवस – माझे झाड’ या संकल्पनेअंतर्गत आता महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाढदिवसानिमित्त एक रोपटे लावले जाणार आहे.
केवळ वाढदिवस साजरा करून न थांबता, निसर्गाचे देणे फेडणे आणि पर्यावरण संवर्धनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्याच्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा त्या नजीकच्या काळात विविध फळझाडे व फुलझाडांची लागवड केली जाईल. लावलेल्या प्रत्येक झाडाला संबंधित विद्यार्थ्याचे नामकरण (नेमप्लेट) केले जाणार आहे. यामुळे विद्यार्थी आणि झाड यांच्यात एक भावनिक नाते तयार होऊन झाडाचे संगोपन व जतन करण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल.
उपक्रमाचा शुभारंभ: या हरित उपक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी कु. मोनिका भालशंकर हिच्या हस्ते रोप लावून करण्यात आली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजनकर ओमप्रकाश, एन. एस. एस. प्रमुख प्रा. सुतार प्रसाद, आयक्युएसी (IQAC) प्रमुख डॉ. खुमणे डी. डी. आणि कल्चरल प्रमुख प्रा. गंगणे विवेक यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या या हरित व सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.






