मुरूम येथील ग्रामदैवत श्री.कपिलसिध्द मल्लिकार्जुन देवस्थान येथे सुरू असलेल्या पुराण सोहळ्यास शरणजी पाटिल यांची उपस्थिती.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
मुरूम नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री. कपिलसिद्ध मल्लिकार्जुन देवस्थानात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण मासानिमित्त धार्मिक पुराण सोहळ्याचे आयोजन ( दि.३१ )रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आले. नगराध्यक्ष बापूराव काका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक सोहळ्याला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आज या धार्मिक पुराण सोहळयास सप्तनिक उपस्थित राहून शरण पाटिल यांनी पुराण श्रवण केले.
यावेळी महासती शिवशरणी हेमरड्डी मल्लम्मा महात्म्य पुराणाचे वाचन परमपूज्य डॉ. राजशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी केले. त्यांच्या ओघवत्या वाणीतून मल्लम्मा यांच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांचे धार्मिक व सामाजिक कार्य तसेच भक्ती, त्याग, श्रद्धा आणि समर्पणाचा संदेश भाविकांसमोर मांडण्यात आला. पुराण श्रवणातून उपस्थित भाविकांना आध्यात्मिक समाधानासोबतच सामाजिक आणि नैतिक मूल्यांची प्रेरणाही मिळाली असल्याचे मत शरण पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
मराठवाड्यातील मुरूम शहरात मागील पाच दशकांपासून हा धार्मिक सोहळा अविरतपणे सुरू आहे. काळ बदलला, पिढ्या बदलल्या तरी या परंपरेची भक्ती आणि श्रद्धा आजही कायम असल्याचे या सोहळ्यातून दिसून येते. दरवर्षी श्रावण महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या या पुराण सोहळ्यामुळे मुरूम शहरासह परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते.
या धार्मिक कार्यक्रमाला प्रशांत पाटील,अमर भोसगे,सौ.ज्योती सुजित शेळके,सुजित शेळके, हळ्ळे सर,निलाप्पा भोसगे,सिध्दाप्पा कळसे,यांच्यासह मंदिर समिती व्यवस्थापक व विश्वस्त सदस्य महिला भगिनींचा विशेष सहभाग लाभला. मोठ्या संख्येने महिला भाविकांनी उपस्थित राहून पुराण श्रवणाचा लाभ घेतला. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि भक्तिभाव यामुळे सोहळ्याला विशेष रंगत आली. पुराणाच्या प्रत्येक भागाला भाविकांकडून मनोभावे प्रतिसाद मिळत होता.
कपिलसिद्ध मल्लिकार्जुन देवस्थानाशी मुरूम परिसरातील नागरिकांची श्रद्धा आणि भावनिक नाते जोडलेले आहे. त्यामुळे श्रावण मासातील या धार्मिक सोहळ्याला दरवर्षी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते.
धार्मिक परंपरेचे जतन करत पुढील पिढीपर्यंत संस्कार आणि अध्यात्माचा संदेश पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या सोहळ्याच्या माध्यमातून होत असुन
श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वात आयोजित करण्यात आलेल्या या पुराण सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन दणाणून निघाला असून, पाच दशकांची ही धार्मिक परंपरा यापुढेही अशीच अखंड सुरू राहावी, अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.








