धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक ‘मॉड्युलर पेडियाट्रिक आयसीयू’; ८.५५ कोटींचा निधी मंजूर!
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांना यश; गंभीर बालरुग्णांना आता धाराशिवमध्येच मिळणार दर्जेदार उपचार.
तुळजापूर प्रतिनिधी;-
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोगचिकित्सा विभाग अधिक सक्षम आणि अत्याधुनिक करण्याच्या दृष्टीने महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. बालरुग्णांवर वेळेत व प्रभावी उपचार व्हावेत यासाठी अत्याधुनिक ‘मॉड्युलर पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट’ (Pediatric ICU) उभारणीस शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यासाठी ८ कोटी ५५ लाख ५ हजार २४४ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली.
राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राज्य योजनेंतर्गत उपलब्ध अनुदानातून ही यंत्रसामग्री खरेदी केली जाणार आहे.
या निर्णयाची ठळक वैशिष्ट्ये:
तपशीलमाहिती
मंजूर निधी₹ ८,५५,०५,२४४/-
सुविधामॉड्युलर पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट ऑन टर्न की (Pediatric ICU)
लाभार्थीधाराशिव जिल्हा व परिसरातील गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा मिळणार.
मोठ्या शहरांवरील अवलंबित्व संपणार
बालरुग्णांना अचानक उद्भवणाऱ्या गंभीर आजारांवर किंवा आणीबाणीच्या प्रसंगी तातडीने अतिदक्षता उपचारांची गरज असते. धाराशिवमध्येच अत्याधुनिक सुविधांनी युक्त स्वतंत्र बाल अतिदक्षता विभाग सुरू होत असल्याने जिल्ह्यातील आणि लगतच्या ग्रामीण भागातील बालकांना वेळेवर, प्रगत आणि दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळणे सुलभ होणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे संपूर्ण धाराशिव जिल्हावासीयांच्या वतीने आभार मानले आहेत.





