तुळजाभवानी नवरात्र महोत्सव: भाविकांच्या सोयी-सुविधा आणि सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज; जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी घेतला आढावा!
तुळजापूर प्रतिनिधी:-
श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. परंपरेनुसार ३ ऑक्टोबर रोजी देवीची मंचकी निद्रा सुरू होईल, तर ११ ऑक्टोबरला घटस्थापना होणार आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली सैनिकी विद्यालयात सर्व विभागांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
महोत्सव काळात भाविकांना उत्तम सुविधा व सुरक्षा मिळावी यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत:
- आरोग्य व स्वच्छता: भाविकांच्या आरोग्यासाठी ६ प्रमुख मार्गांवर २२ प्रथमोपचार केंद्रे, साथरोग नियंत्रण पथके आणि गर्दीत तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी ‘बाईक ॲम्ब्युलन्स’ सज्ज राहतील. नगर परिषदेतर्फे २०० मोबाईल टॉयलेट, विश्रामकक्ष, भवानी कुंड येथे स्नानगृह आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली जाईल.
- सुरक्षा व वाहतूक: सुरक्षेसाठी २,८०० पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार असून वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र पथके काम करतील. गर्दीच्या काळात वाहतूक मार्गांत आवश्यक बदल केले जातील.
- अन्न सुरक्षा: खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर ‘अन्न व औषध प्रशासन’ लक्ष ठेवणार आहे. खवा, पेढे, दूध व तेलाचे नमुने तपासले जातील, तसेच अन्न विक्रेत्यांसाठी स्वच्छताविषयक प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाईल.
- रस्ते व वीजपुरवठा: शहराकडे येणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे बुजवून दिशादर्शक फलक लावले जात आहेत. विद्युत विभागामार्फत २४ तास अखंडित वीजपुरवठा दिला जाईल.
- दर्शन सोय: नगर परिषदेकडून घाटशीळ येथे दर्शन मंडप, मंडप उभारणी, चप्पल स्टँड आणि लॉकर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या बैठकीला पोलिस अधीक्षक रितू खोकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे, महंत अमरोजी बुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व मानकरी उपस्थित होते.







