धाराशिवत ७ सप्टेंबरला धान्य वितरण ठप्प! e-POS मशिनमधील तांत्रिक अडचणींमुळे रेशन दुकानदारांचा एक दिवसीय संप.
तुळजापूर प्रतिनिधी :-
केंद्र शासनाच्या NIC च्या माध्यमातून e-POS मशिनवर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि इंटरनेट सर्व्हरच्या समस्यांमुळे, उस्मानाबाद जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेता असोसिएशनने येत्या सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात एक दिवस धान्य वितरण व्यवस्था पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य फेडरेशनच्या आवाहनानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, याबाबतचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी, धाराशिव यांना असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आले आहे.
शासनाच्या दुर्लक्षामुळे संप पुकारण्याचा इशारा
वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे परवानाधारक रेशन दुकानदार आणि लाभार्थी शिधापत्रिकाधारक या दोघांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येबाबत राज्य फेडरेशनच्या शिष्टमंडळाने २१ ऑगस्ट २०२६ रोजी मंत्रालयात संबंधित प्रशासन व विभागाशी प्रत्यक्ष भेट देऊन लेखी निवेदन दिले होते. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई वा सुधारणा न झाल्याने हा संपाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.
संपूर्ण जिल्ह्यात धान्य वितरण बंद राहणार
असोसिएशनने दिलेल्या इशार्यानुसार, ७ सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील सर्व शहरे, तालुके आणि ग्रामीण भागातील रास्तभाव धान्य दुकानांमधील e-POS मशिन दिवसभर पूर्णपणे बंद राहतील. यामुळे सोमवारी जिल्ह्यातील धान्य वितरण ठप्प राहणार असून, प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याप्रसंगीकार्याध्यक्ष प्रफुल कुमार शेटे, रामराव पाटील ,प्रसाद निंबाळकर, अमर किरजत इत्यादी अधिकारी निवेदन देताना उपस्थित होते.







