‘तुमसे ना हो पायेगा!’ – मराठवाड्याच्या रखडलेल्या विकासावरून महायुती सरकारविरोधात शिवसेना (UBT) आक्रमक; १७ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचा एल्गार!
तुळजापूर प्रतिनिधी:-
छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ४७ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचा आणि अनेक योजनांचा कोणताही पत्ता नसून मराठवाड्याचे सर्व प्रश्न प्रलंबित आहेत. महायुती सरकारच्या या फसव्या घोषणांचा समाचार घेण्यासाठी आणि दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात ‘तुमसे ना हो पायेगा’ हे जनआंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाचा मुख्य एल्गार १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला आमदार प्रविण स्वामी, जिल्हा सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, संजय निंबाळकर आणि युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आंदोलनाची रूपरेषा आणि मुख्य मुद्दे-
तालुका आणि जिल्हास्तरावर धरणे आंदोलने-
६ सप्टेंबरपासून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत आंदोलनाला सुरुवात होणार असून, ८ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे एक दिवसीय धरणे आंदोलन केले जाईल. तसेच तहसीलदार स्तरावर निवेदने देऊन सरकारला प्रलंबित घोषणांची आठवण करून दिली जाईल. १७ सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे विभागीय आयुक्तांशी चर्चा करून आंदोलनाचे नेतृत्व करतील.
दुष्काळ जाहीर करण्याची पहिली मागणी-
शेतात लोडशेडिंग, व्होल्टेज ड्रॉप आणि विजेअभावी पिके वाळत आहेत. शेतकरी आत्महत्या करत असताना सरकारने अद्याप साधे पंचनामे करण्याचे आदेशही दिलेले नाहीत. त्यामुळे तातडीने दुष्काळ जाहीर करून दुष्काळी उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे.
कृष्णा-मराठवाडा प्रकल्प अन् सिंचनातील भ्रष्टाचार-
१० हजार कोटींचा कृष्णा मराठवाडा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला असून काम वेळेत न झाल्याने खर्च वाढत चालला आहे. या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, सांगलीच्या पुराच्या पाण्याचा धाराशिव जिल्ह्याला कोणताही ठोस फायदा झाला नसल्याचे आमदारांनी स्पष्ट केले.
पीक विमा आणि शेतकरी फसवणूक-
पीक विम्यामधून ‘ट्रिगर’ काढल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. केवळ सॅटेलाईट सर्वेक्षण करून पिकांचे उत्पन्न ठरवू नये, कारण वरून हिरवे दिसणारे सोयाबीन आतून हाती लागत नाही, असा तांत्रिक मुद्दा मांडण्यात आला.
स्थानिक आणि इतर महत्त्वाच्या मागण्या-
विभाग / विषयप्रमुख मागण्या व आरोप
शिक्षण व शाळाधाराशिव जिल्ह्यातील ३११ वर्गखोल्या धोकादायक स्थितीत आहेत; शाळांची दुरुस्ती तातडीने करावी.
विद्यापीठ दर्जाउपकेंद्रात सर्व सुविधा, कोर्सेस व स्टाफ उपलब्ध असताना धाराशिवसाठी स्वतंत्र विद्यापीठ जाहीर करावे.
भूकंपग्रस्त पुनर्वसनभूकंपग्रस्त भागातील ३७ गावांना विशेष पॅकेज देऊन पुनर्वसन करावे व उमरगा भागात उद्योग आणावेत.
स्मार्ट मीटर व एसटी कार्डग्राहकांच्या परवानगीशिवाय बसवलेले स्मार्ट मीटर रद्द करावेत; महिलांसाठी एसटी कार्डची सक्ती थांबवावी.
पायाभूत सुविधाशहरातील रस्त्यांची दुरावस्था, जलजीवन मिशनचे अपूर्ण कामे आणि कचरा डेपोचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा.
आमदार प्रविण स्वामी यांनी ‘शक्तीपीठ महामार्ग’ ही केवळ लाडक्या ठेकेदारांना सांभाळण्याची योजना असल्याचा घणाघात केला. बहुमत असूनही सरकार केवळ आमदार-खासदार फोडण्यात व्यस्त असून जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.








