Best News Portal Development Company In India

खोटं सोनं देऊन वृद्धांना लुटणारी टोळी गजाआड; धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, ४.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त!

खोटं सोनं देऊन वृद्धांना लुटणारी टोळी गजाआड; धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, ४.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त!
​तुळजापूर  प्रतिनिधी:-
तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आणि वृद्धांना खोट्या सोन्याचे बिस्कीट देऊन त्यांचे खरे दागिने लुटणाऱ्या भामट्याचा धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषीकेश बंडू जाधव (वय २५, रा. बीड) याला शिताफीने अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी आणि सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
​नेमकी घटना काय?
दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी निनाबाई चौगुले या वृद्धा तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आल्या होत्या. त्यावेळी काही अज्ञात इसमांनी त्यांना गाठून, बोलण्यात गुंतवले. आरोपींनी त्यांना खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन त्या बदल्यात त्यांच्या अंगावरील खरे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. ४३०/२०२६, कलम ३१८(४), ३(५) BNS) दाखल करण्यात आला होता.
​LCB ची जाळे फेकून कारवाई
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास चक्रावली. ५ सप्टेंबर २०२६ रोजी संशयित आरोपी ऋषीकेश जाधव (रा. गांधी नगर, तेलगाव नाका, बीड) याच्यावर पाळत ठेवून त्याला ताब्यात घेण्यात आले. खाकीचा दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली व आपल्या इतर साथीदारांची नावेही निष्पन्न केली. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला तुळजापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
​कारवाई करणारे पोलीस पथक
धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्ज्पवार, सपोनि सुदर्शन कासार, पोलीस अंमलदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण आणि चालक रत्नदीप डोंगरे व नागनाथ गुरव यांनी ही कामगिरी फत्ते केली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india