Best News Portal Development Company In India

रामदरा तलावात अवतरणार कृष्णेचे पाणी! तीव्र पाणीटंचाईच्या काळात धाराशिवकरांना मिळणार मोठा दिलासा.

रामदरा तलावात अवतरणार कृष्णेचे पाणी! तीव्र पाणीटंचाईच्या काळात धाराशिवकरांना मिळणार मोठा दिलासा.
​कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे ९९.९९% काम पूर्ण.
​येत्या महिनाभरात पाण्याची चाचणी घेण्याचे नियोजन: आमदार राणाजगजितसिंह पाटील
​तुळजापूर प्रतिनिधी :-
जिल्ह्यात सध्या निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर धाराशिवकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या योजना क्रमांक दोनचे ९९.९९ टक्के काम पूर्ण झाले असून, तुळजाभवानी मातेच्या चरणी असलेल्या रामदरा तलावात कृष्णेचे पाणी प्रत्यक्ष दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या महिनाभरात या पाण्याची चाचणी घेण्याचे नियोजन असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
​अडथळे दूर, कामाला मिळाली गती
प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात बार्शी तालुक्यातील मुंगशी गावाजवळ वीज वाहिनी आणि जमिनीचा प्रश्न निर्माण झाल्याने काम काही काळ रखडले होते. मात्र, शेतकरी बांधवांशी चर्चा करून हा प्रश्न यशस्वीरीत्या सोडवण्यात आला असून जमिनीखालून केबल टाकण्याचे कामही पूर्णत्वाकडे आहे. घाटणे बॅरेजजवळील उर्वरित कामे पूर्ण करून लवकरच पाणी सोडण्याची चाचणी घेतली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे ११,७०० कोटी रुपयांच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याने प्रकल्पाच्या कामाला मोठी गती मिळाली आहे.
​रामदरा तलाव ठरणार धाराशिवचा ‘आधारवड’
उजनी धरणातून भीमा-सीना जोड बोगद्याद्वारे कृष्णेचे पाणी सीना नदीत आणले जाईल. तेथून पुढे हे पाणी घाटणे बॅरेजमार्गे २० दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता असलेल्या रामदरा तलावात सोडले जाईल.
​पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार: जिल्ह्यातील इतर सर्व प्रकल्पांत सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध नसल्याने, रामदरामधील पाणी पिण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
​टँकरद्वारे पुरवठा शक्य: तीव्र टंचाईच्या काळात या तलावातून ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य होणार असून नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
​संभाव्य टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन हे काटेकोर पूर्वनियोजन करण्यात आले असून, आगामी काळात रामदरा तलाव संपूर्ण जिल्ह्यासाठी मोठा आधारवड ठरेल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail