तुळजापूर पोलिसांची धडक कारवाई! भाविकाचे चोरीस गेलेले ४ तोळ्यांचे सोन्याचे गंठण केले हस्तगत; बारामतीच्या महिला भाविकाला दिलासा.
तुळजापूर प्रतिनिधी :-
श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या बारामती येथील महिला भाविकाचे चोरीस गेलेले चार तोळ्यांचे सोन्याचे गंठण अवघ्या काही दिवसांत हस्तगत करत तुळजापूर पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या कारवाईमुळे सोलापूरच्या तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले असून, फिर्यादी महिलेला त्यांचे दागिने सुरक्षित परत करण्यात आले आहेत.
बारामती येथील रहिवासी आशा उर्फ चिमणाबाई दयाराम शिंदे या दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आल्या होत्या. मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ४ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण लांबवले. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३७/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
तपासाची चक्रे फिरली आणि आरोपी अटकेत
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मनोहर पाटील व पोलीस निरीक्षक श्री. अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. पोलीस हवालदार बालाजी कामतकर यांनी अत्यंत कौशल्याने आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे तपास करत आरोपींचा सुगावा लावला.
या कारवाईत पोलिसांनी रोहित हातोरे, विमलबाई गायकवाड आणि सुशिलाबाई गायकवाड (सर्व रा. सोलापूर) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्याचे गंठण (मंगळसूत्र) यशस्वीरीत्या हस्तगत करण्यात आले.
फिर्यादीला मोठा दिलासा
पोलीस प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हस्तगत केलेले सोन्याचे गंठण मूळ फिर्यादी आशा उर्फ चिमणाबाई शिंदे यांना सन्मानाने परत केले. आपले चोरीस गेलेले दागिने सुखरूप परत मिळाल्याने शिंदे यांनी तुळजापूर पोलिसांचे आणि विशेषतः तपास अधिकारी बालाजी कामतकर यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. पोलिसांच्या या तत्पर कामगिरीमुळे तुळजापुरात येणाऱ्या भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.






