दुर्दैवी अंत: MPSC ची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबाचे काँग्रेसकडून सांत्वन; पुढील पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली!
तुळजापूर प्रतिनिधी;-
एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या परंडा तालुक्यातील खासापुरी येथील प्रथमेश देशमुख यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांनी आज प्रथमेश यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले.
शेतीचे नुकसान अन् परीक्षेतील अपयशामुळे नैराश्य
गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे देशमुख कुटुंबाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षीही पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून सोयाबीनसह उभी पिके करपून गेली आहेत. एकीकडे शेतीचे झालेले नुकसान, तर दुसरीकडे MPSC परीक्षेत अत्यंत कमी फरकाने आलेले अपयश तसेच पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरप्रकारांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता, अशा अनेक प्रतिकूल परिस्थितींचा प्रथमेश यांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम झाला होता.
सरकारच्या अपयशावर घणाघात
या प्रसंगी बोलताना उमेश राजे निंबाळकर म्हणाले, “शेतकरी संकटात असताना त्यांना भक्कम आधार देणे आणि विद्यार्थ्यांना पारदर्शक व विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, दोन्ही पातळ्यांवर सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. प्रथमेशसारख्या होतकरू तरुणांची स्वप्ने या परिस्थितीची बळी ठरू नयेत, यासाठी सरकारने संवेदनशीलतेने पावले उचलण्याची गरज आहे.”
काँग्रेस भक्कमपणे पाठीशी
प्रथमेश यांच्या जाण्याने देशमुख कुटुंबावर डोंगर कोसळला असून ही आयुष्यभराची वेदना आहे. मात्र, या कठीण काळात कुटुंबाला एकटे पडू दिले जाणार नाही, असा विश्वास काँग्रेसने दिला आहे. धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीने प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबाच्या पुढील सर्व पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली असून, काँग्रेस पक्ष सदैव या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही उमेश राजे निंबाळकर यांनी दिली.
या भेटीदरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी देशमुख कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि दिवंगत प्रथमेश यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.







