स्पर्धा परीक्षेचे स्वप्न अपूर्णच! आर्थिक टंचाई आणि दुष्काळाच्या झळांमुळे परंड्यातील शेतकरी पुत्राची पुण्यात जीवनयात्रा संपवली!
तुळजापूर प्रतिनिधी:- आमदार कैलास पाटलांनी सांत्वन करत देशमुख कुटुंबीयांना दिला धीर; प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची ग्रामस्थांची मागणी.
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भविष्याचे सुरेख स्वप्न डोळ्यांत बाळगून पुण्यात रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या परंडा तालुक्यातील खासापुरी येथील प्रथमेश दिलीप देशमुख (वय २५) या उमद्या तरुणाने आर्थिक अडचणी आणि दुष्काळी परिस्थितीला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. एका होतकरू शेतकरी पुत्राचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परंडा व भूम परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र सुन्न शांतता पसरली आहे.
प्रथमेशच्या पाठीमागे चार बहिणी आणि आई असा परिवार आहे. वडिलांचे छत्र आधीच हरपल्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आणि आशा प्रथमेशवरच होत्या. परंतु, घरातील एकुलत्या एक कमावत्या व शिकत्या मुलाने असा अचानक जगाचा निरोप घेतल्याने देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगराच कोसळला आहे.
आमदार कैलास पाटलांकडून सांत्वन व आर्थिक मदत
या क्लेशदायक घटनेची माहिती मिळताच आमदार कैलास पाटील यांनी खासापुरी येथे देशमुख कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अत्यंत भावूक वातावरणात त्यांनी प्रथमेशच्या आईची व कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. “या कठीण काळात आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहोत,” असा धीर देत आमदारांनी देशमुख कुटुंबीयांना वैयक्तिक स्वरूपात आर्थिक सहकार्यही सुपूर्द केले.
यावेळी प्रथमेशची अश्रूभरीत आई, दाजी काकासाहेब घाडगे, शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील, राकेश सूर्यवंशी, माजी सरपंच शंकर चव्हाण, बालाजी देशमुख, सचिन देशमुख, राजाभाऊ गायकवाड, बापुसाहेब देशमुख, मारुती ननवरे, साहेबराव पाडुळे आणि संदीप देशमुख यांच्यासह खासापुरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज
ग्रामीण भागातील शेतकरी मुले शहरात जाऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र वाढता खर्च, दुष्काळी परिस्थिती आणि रोजच्या आर्थिक विवंचनेमुळे विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत ढकलले जात आहेत. अशा घटना रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने व सरकारने गांभीर्याने ठोस पावले उचलावीत, असा उद्विग्न सूर या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला.







