गणेश उत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करा – पोनि प्रल्हाद सुर्यवंशी !
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
आपल्या राज्याला गणेश उत्सवाची महान परंपरा लाभली आहे. स्वांतंत्र्या नंतर लोकमान्य टिळक यांनी राष्ट्रीय ऐक्या करीता गणेश उत्सवाची सुरुवात केली. आपला महाराष्ट्राला साधू संत व ऋषि मुनींच्या संस्काराचा वारसा लाभला आहे. गणेशोत्सव हा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.सांस्कृतिक वैभवाचे प्रतिक मानण्यात येणारा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करा असे अवाहन उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांनी केले.
तालुक्यात साजरा करण्यात येणाऱ्या गणेश उत्सवा निमित्त येथील पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते होते. आमदार प्रवीण स्वामी सपोनि श्रीकांत भराटे , सपोनि पिराजी तायवाडे, सपोनि पांडूरंग कन्हेरे पोऊनि दिनेश जाधव ,पोऊनि रामहरी चाटे , पोऊनि प्रमोद जगताप , पोऊनि वाजिद शेख सह विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना पोनि सुर्यवंशी म्हणाले कि आपल्या महाराष्ट्र राज्याला साधू संतांच्या त्यागातून अध्यात्माचे वारसा लाभला आहे. महाराष्ट्राने जगाच्या क्षितिजावर उत्सवप्रिय राज्य म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. होणारा गणेशोत्सव हा राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून उत्साहात साजरा करा. न्यायालयाने डिजेवर बंदी घातली आहे. न्यायालयाचा सन्मान करून पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सव साजरा करावा.
पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या ७४ गावां पैकी २९ गावांत एक गांव एक गणपती हि संकल्पना राबविण्यात येत आहे. शासनाने सुरू केलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पारितोषीके प्राप्त करा. गणेशोत्सव शांततेत पार पडावा या साठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एकूण २०५ गणेश मंडळा पैकी १८५ मंडळांनी अधिकृत परवाना घेतला आहे. उर्वरीत मंडळांनी तात्काळ परवाना घ्यावा. कायद्याचा सन्मान करून गणेशोत्सव आनंदाने साजरा करा असे अवाहन त्यांनी केले.
या वेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गणेशोत्सव कालावधी दरम्यान सुरळीत विद्युत पुरवठा , मिरवणूक मार्गावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती , गणेश मूर्ती विसर्जना करिता कृत्रिम तलाव सार्वजनिक स्वच्छता या विविध सुविधा तात्काळ देण्याच्या सुचना नगर परिषद , पंचायत समिती , ग्रामपंचायत , विद्युत वितरण या विविध कार्यालयांना देण्यात आल्या. प्रास्ताविक सपोनि श्रीकांत भराटे यांनी केले . सुत्रसंचलन गोपनीय शाखेचे धनाजी वाघमारे यांनी केले. आभार अमर जाधव यांनी मानले. या शांतता समितीच्या बैठकी करिता व्यापारी महासंघ. सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी पंस . जिप नपचे अधिकारी विद्युत वितरण सार्वजनिक बांधकाम , वैद्यकिय अधिकारी यांची उपस्थिती होती.






