Best News Portal Development Company In India

कामठा कात्री शिवारातील वीज डीपीचा ‘शॉकिंग’ कारभार! काही महिन्यांतच दुरवस्था; निकृष्ट कामामुळे शेतकऱ्यांचा संताप, चौकशीची मागणी.

कामठा कात्री शिवारातील वीज डीपीचा ‘शॉकिंग’ कारभार!
काही महिन्यांतच दुरवस्था; निकृष्ट कामामुळे शेतकऱ्यांचा संताप, चौकशीची मागणी

तुळजापूर प्रतिनिधी:- तालुक्यातील कामठा कात्री शिवारात काही महिन्यांपूर्वी बसविण्यात आलेल्या विद्युत डीपीची प्रचंड दुरवस्था झाल्याचे समोर आले असून, या डीपी निकृष्ट दर्जाच्या साहित्याने उभारण्यात आल्याचा आरोप शेतकरी व ग्रामस्थांकडून केला जात आहे. काही महिन्यांतच डीपी धोकादायक अवस्थेत पोहोचल्याने संबंधित कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डीपीची अवस्था इतकी खराब झाली आहे की दुरुस्तीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. “या डीपीमुळे एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

सध्या खरीप हंगामातील पिके निर्णायक टप्प्यावर असताना डीपीच्या बिघाडामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाळून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

आधीच दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता वीजपुरवठ्याचे नवे संकट उभे राहिले आहे. वेळेत दुरुस्ती न झाल्यास आर्थिक नुकसान वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तुळजापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी अशाच प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या डीपी बसविण्यात आल्याचा आरोप होत आहे. या कामांमधून लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगू लागली आहे.

शेतकरी व ग्रामस्थांनी संपूर्ण तालुक्यातील नव्याने बसविण्यात आलेल्या डीपींची तातडीने तांत्रिक तपासणी करण्यात यावी, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी तसेच संबंधित अभियंत्यांची जबाबदारी निश्चित करावी.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india