धाराशिव हादरले! मोटारसायकल नेण्याच्या क्षुल्लक वादातून बुकनवाडीत तरुणाची निर्घृण हत्या; ५ जण गंभीर जखमी!
तुळजापूर प्रतिनिधी:-
मोटारसायकल चौकातून घेऊन जाण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांत झालेल्या रक्तरंजित संघर्षात एका २४ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना धाराशिव जिल्ह्यातील बुकनवाडी (ता. जि. धाराशिव) येथे घडली असून, या जीवघेण्या हल्ल्यात अन्य ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ढोकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तब्बल २१ जणांवर आणि इतर अज्ञातांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश सुरेश चामे (वय २४, रा. बुकनवाडी) असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास बुकनवाडी येथील विठ्ठल रुक्माई चौकात हा प्रकार घडला. चौकातून मोटारसायकल घेऊन जाण्याच्या कारणावरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवली. यातून झालेल्या वादाचे रूपांतर भयंकर हाणामारीत झाले.
आरोपींनी मयत महेश चामे याच्या पोटात धारदार हत्यार खुपसून त्याला गंभीर जखमी केले, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्याला वाचवण्यासाठी आलेले मारुती परगे, काका परगे, करण आवले, सतीश आवले आणि नाना आवले यांच्यावरही आरोपींनी तलवार, कोयता, कत्ती, विळा, कुऱ्हाड आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात हे पाचही जण गंभीर जखमी झाले आहेत.
या भीषण घटनेनंतर मयताचे वडील सुरेश आप्पाराव चामे (वय ४०) यांनी ढोकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी शनिवारी (१२ सप्टेंबर) खालील मुख्य आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
मुख्य आरोपी- बन्सी काळे, पिंटू काळे, देवराव काळे, कोंबड्या काळे, दत्ता काळे, बेगा काळे, शोभा काळे, यमुना काळे, कैलास काळे, पोपट शिंदे, कारकून शिंदे, महादेव शिंदे, मोतीराम काळे, तानाजी काळे, बादल काळे, मुकरा काळे, सचिन शिंदे, वैशाली शिंदे, गितू काळे, विशाल काळे, पापा शिंदे व इतर.
या सर्वांवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१), १०९(१), ११८(१), ११८(२), १८९, १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), १९१(३) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून ढोकी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






