धाराशिव जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा! AIMIM ची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे जोरदार मागणी!
तुळजापूर प्रतिनिधी;-
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात खरीप हंगामात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. या गंभीर संकटामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला असून, जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना शासकीय सवलती व मदत द्यावी, या मागणीचे निवेदन ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (AIMIM) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी धाराशिव यांना देण्यात आले.
AIMIM चे जिल्हा अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष मा. शहेबाज अ. उलूम काझी यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन सादर करण्यात आले आहे. वाढता उत्पादन खर्च आणि पावसाची अनियमितता यामुळे शेतकरी आधीच हैराण झाला असून, प्रशासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दुष्काळ घोषणा- धाराशिव जिल्ह्यात तातडीने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून दुष्काळी मदत लागू करावी.
नुकसानीचे पंचनामे: जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये पिकांचे तातडीने प्रत्यक्ष पंचनामे करून अहवाल
पीकविमा व मदत: पीकविमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई मिळवून द्यावी व शासनाकडून तातडीची आर्थिक मदत द्यावी.
चारा छावण्या व पाणीपुरवठा: पशुधनासाठी चारा-पाण्याची व्यवस्था करून आवश्यकतेनुसार चारा छावण्या सुरू कराव्यात.
टँकरद्वारे पाणी: पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये तातडीने टँकर सुरू करावेत.






