अभियंता दिनानिमित्त तुळजापूर-धाराशिव विभागातील महावितरणच्या अभियंत्यांचा भव्य सत्कार!
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा उपक्रम; सेवेतील योगदानाबद्दल व्यक्त केली कृतज्ञता
तुळजापूर प्रतिनिधी:-
अभियंता दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने तुळजापूर आणि धाराशिव विभागातील विविध स्तरांवर कार्यरत असलेल्या अभियंता अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. वीज वितरण व्यवस्था अहोरात्र सुरळीत ठेवण्यासाठी अभियंते बजावत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करत त्यांना संघटनेतर्फे अभियंता दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
अभियंत्यांचे योगदान कौतुकास्पद
वीज वितरण व्यवस्था अखंडित ठेवणे ही अत्यंत आव्हानात्मक जबाबदारी असते. वाढता वीजभार, अचानक उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी, ग्राहकांच्या समस्या, आपत्कालीन परिस्थिती आणि नियमित देखभाल-दुरुस्तीची कामे या सर्व आव्हानांना तोंड देत अभियंते सतत जबाबदारीने कार्य करतात. त्यांच्या याच महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन व कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मान्यवर अधिकारी व अभियंत्यांचा गौरव
या सोहळ्यात संघटनेच्या वतीने खालील प्रमुख अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला:
निलांबरी कुलकर्णी – मंडळ कार्यकारी अभियंता
नंदकुमार काळे – कार्यकारी अभियंता, तुळजापूर विभाग
नरेंद्र रडे – कार्यकारी अभियंता, धाराशिव विभाग
दीपक कोतले – अतिरिक्त कार्यकारी अभियंता, तुळजापूर
राहुल पवार – अतिरिक्त कार्यकारी अभियंता, धाराशिव
यांच्यासह तुळजापूर व धाराशिव विभागातील सर्व उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांचाही संघटनेच्या वतीने यथोचित सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती.
या सत्कार सोहळ्याच्या वेळी संघटनेचे मंडळ अध्यक्ष बापू जगदे, मंडळ सचिव नूर शेख, अमीर शेख यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी, महावितरणचे कर्मचारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.






