सोशल मीडियाच्या प्रेरणेतून जपली सामाजिक बांधिलकी! तुळजापुरात विद्यार्थ्यांना ३०० दप्तरांचे वाटप!
तुळजापूर प्रतिनिधी:-
मैदानातील खेळाच्या माध्यमातून निर्माण झालेली मैत्री केवळ खेळापुरती मर्यादित न ठेवता ती समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा एक सुंदर आदर्श राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लबने घालून दिला आहे. सोशल मीडियावरील सकारात्मक संदेशातून प्रेरणा घेत, तुळजापूर येथील जिल्हा परिषद कन्या शाळा आणि नगरपरिषद शाळा क्रमांक २ मधील सुमारे २०० ते ३०० गरजू विद्यार्थ्यांना नुकतेच शैक्षणिक दप्तरांचे वाटप करण्यात आले.
सोशल मीडिया बनला प्रेरणेचा धागा-
राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लबतर्फे यापूर्वी रक्तदान शिबिर आणि शैक्षणिक साहित्य वाटपासारखे विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. या उपक्रमांचे छायाचित्रे व व्हिडिओ इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर प्रसिद्ध करण्यात आले होते. हे कार्य पाहून ऋषिकेश साळुंखे यांचे मित्र निलेश मुरकडे यांनाही समाजोपयोगी काम करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी साळुंखे यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांसाठी तब्बल दोनशे ते तीनशे दप्तरांचे मोलाचे योगदान दिले.
विद्यार्थ्यांच्या हास्यातून लाभला आत्मिक आनंद
साहित्य वाटपाच्या वेळी दप्तर मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि निरागस हास्य पाहून उपस्थित मान्यवर भावुक झाले. याप्रसंगी बोलताना क्लबचे अध्यक्ष बिपीन शिंदे म्हणाले, “आमचा क्लब केवळ क्रिकेट खेळणाऱ्या मित्रांचा समूह नसून, समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारे माध्यम आहे. सोशल मीडियामुळे एका व्यक्तीला मिळालेली प्रेरणा दुसऱ्यापर्यंत पोहोचून समाजकार्याची ही सुंदर साखळी निर्माण झाली आहे. भविष्यातही गरजू विद्यार्थ्यांसाठी असे कार्य सातत्याने सुरू राहील.”
उपक्रमातील उपस्थिती-
या सामाजिक कार्यक्रमास राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लबचे अध्यक्ष बिपीन शिंदे यांच्यासह ऋषिकेश साळुंखे, सचिन शिंदे, प्रणव मलवा, सिद्धीराज कदम, सुरज चौबेले, सुजित नावडे आणि शुभम राजापूरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना क्लबतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही देण्यात आली.
खेळातून मैत्री आणि मैत्रीतून सामाजिक बांधिलकी जपत राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लबने उभा केलेला हा उपक्रम तुळजापूर शहरात कौतुकाचा विषय ठरत आहे. अशाच प्रकारे समाजातील इतर दानशूर व्यक्तींनी आणि मित्रपरिवाराने गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.









