Best News Portal Development Company In India

दुष्काळाचे भान अन् सामाजिक बांधिलकीचे भान! सारा गौरव मंडळाचा तुळजापुरात स्तुत्य उपक्रम; वर्गणी आणि मिरवणुकीचा खर्च टाळून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व खाऊचे वाटप!

दुष्काळाचे भान अन् सामाजिक बांधिलकीचे भान! सारा गौरव मंडळाचा तुळजापुरात स्तुत्य उपक्रम; वर्गणी आणि मिरवणुकीचा खर्च टाळून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व खाऊचे वाटप!

तुळजापूर प्रतिनिधी:-
महाराष्ट्रावर यंदा असलेल्या दुष्काळाच्या सावटाचे गांभीर्य ओळखून, ढोल-ताशांचा अवाजवी खर्च आणि भव्य मिरवणुका ऐवजी सामाजिक जबाबदारी जपत तुळजापूर येथील ‘सारा गौरव सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळा’ने यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पण अर्थपूर्ण पद्धतीने साजरा केला आहे. मंडळाने वर्गणीमुक्त आणि बिगर मिरवणुकीचा गणेशोत्सव साजरा करत, वाचलेल्या निधीतून जय तुळजामाता आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि खाऊचे वाटप करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

गणेशोत्सवाच्या नावाखाली होणारी अफाट उधळपट्टी आणि भव्य सजावटीचा अनावश्यक खर्च टाळून तो निधी गरजू मुलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी वापरावा, या विचाराने मंडळाने हा निर्णय घेतला. या उपक्रमांतर्गत कै. सागर बाळासाहेब चिखलकर यांच्या स्मृती जपत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस हातभार म्हणून स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य हाती पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.

हा कार्यक्रम तुळजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले यांच्या हस्ते पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटपही करण्यात आले. गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च कमी करून तो सामाजिक कार्यात लावणाऱ्या सारा गौरव मंडळाच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करत असताना उत्सवांना सामाजिक कार्याची दिशा देणे अत्यंत गरजेचे बनले आहे. “उत्सव साधेपणाने साजरा करा, पण सामाजिक बांधिलकी मनापासून जपा” असा प्रेरणादायी संदेश देणारा सारा गौरव मंडळाचा हा उपक्रम सध्या संपूर्ण तुळजापूर शहरात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे. कार्यक्रमास मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail