पोलिसांच्या गदारोळानंतर ‘स्वाभिमानी’चे मुख्यमंत्र्यांना थेट निवेदन; “भरीव मदतीशिवाय शेतकरी उभा राहणार नाही” – रवींद्र इंगळे!
तुळजापूर प्रतिनिधी :-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान तुळजापूरमध्ये मोठे नाट्य घडले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रवींद्र भीमाशंकर इंगळे यांना पोलिसांनी ऐनवेळी पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यावर ठाम राहिलेल्या इंगळे यांनी अखेर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर करजखेडा येथे थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना दुष्काळाच्या तीव्रतेबाबत निवेदन दिले.
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा भाग म्हणून तुळजापूर पोलिसांनी सकाळी रवींद्र इंगळे यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. मात्र, “काहीही झाले तरी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडणारच,” अशी ठाम आणि आक्रमक भूमिका इंगळे यांनी घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील यांनी मध्यस्थी केली आणि इंगळे यांना निवेदनासाठी परवानगी दिली. त्यानंतर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात त्यांना करजखेडा येथे नेण्यात आले.
दुष्काळ कठीण, तातडीने मदत द्या!
करजखेडा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन इंगळे यांनी जिल्ह्यातील दुष्काळाची भीषणता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. “मुख्यमंत्री साहेब, यंदाचा दुष्काळ अतिशय कठीण आहे. शासनाने भरीव आणि ठोस मदत दिल्याशिवाय शेतकरी पुन्हा पायावर उभा राहूच शकणार नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे,” अशी आग्रही मागणी इंगळे यांनी निवेदनाद्वारे केली.
‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर’ – मुख्यमंत्र्यांची ग्वाही
निवेदन स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, “मी स्वतः या भागातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलो असून परिस्थीतीची गंभीरता माझ्या निदर्शनास आली आहे. या कठीण काळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील,” अशी ग्वाही दिल्याची माहिती रवींद्र इंगळे यांनी दिली.
या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी धनाजी पेंदे, विष्णू काळे, शहाजी सोमवंशी, तात्या पवार, भोजने, मनोज सरवदे, महादेव टेकाळे, राजेंद्र हाके यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






