तुळजापूरमध्ये गटारी तुंबल्या; दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढला
नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, तातडीची स्वच्छतेची मागणी
तुळजापूर | प्रतिनिधी
तुळजापूर शहरात ठिकठिकाणी गटारी व नाल्या तुंबल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर साचत असून शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असून डासांची उत्पत्तीही झपाट्याने वाढत आहे. या गंभीर प्रश्नाकडे नगर परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्यामुळे नाल्या व गटारी पूर्णपणे तुंबल्या असून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहताना दिसत आहे. त्यातून नागरिकांना आजारांना सामोरे जावे लागत असून, विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. तसेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांपुढे तुळजापूर शहराची अस्वच्छ छबी जात असल्याची खंत नगरसेवकांनी व्यक्त केली.काही ठिकाणी गटारींच्या चेंबरवरील झाकणे मोडकळीस आली असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याची तातडीने दुरुस्ती करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. शिवाय शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे तसेच परिसरात स्वच्छतेअभावी तीव्र दुर्गंधी पसरत आहे.मंजूर ठिकाणी असलेल्या कचरा कुंड्यांची नियमित स्वच्छता करावी तसेच कचरा घंटा गाडी दररोज वेळेवर सर्व प्रभागांमध्ये फिरवण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी नगरसेवकांनी निवेदनातून केली आहे. तुळजापूर शहरातील सर्व नाल्या, गटारी, परिसर व सार्वजनिक स्वच्छतागृहे लवकरात लवकर स्वच्छ करण्याची तातडीची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या निवेदनावर अमोल माधवराव कुतवळ, आनंद नानासाहेब जगताप, अक्षय धनंजय कदम, सौ. प्रगती गोपाळ लोंढे व रणजीत चंद्रकांत इंगळे या नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या असून नगर परिषदेने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे






