*भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर कडक कारवाईची मागणी*
सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन
नळदुर्ग(एस.के.गायकवाड) :
नाशिक जिल्ह्यातील भोंदू बाबा अशोक खरात याने महिलांची फसवणूक करून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून अशा नराधमावर तात्काळ व कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांना नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या प्रभारी आयपीएस मेघना आय. एन. यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, अशोक खरात या भोंदूबाबाने अंधश्रद्धा आणि धार्मिक भावनांचा गैरफायदा घेत महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचे मानसिक व लैंगिक शोषण केल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अशा प्रकारामुळे समाजात भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अशा भोंदूबाबांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्गचे सचिव मारुती बनसोडे, ज्ञानकिरण सामाजिक संस्था अणदूरचे अध्यक्ष भैरवनाथ कानडे, पौर्णिमा महिला मंडळ अणदूरच्या अध्यक्षा बबई चव्हाण, दमयंती शिक्षण संस्था नळदुर्गच्या अध्यक्षा सौ. सुभद्राताई मुळे, अंबव्वा महिला मंडळ जळकोटच्या अध्यक्षा कस्तुराताई कारभारी, रेणुका महिला बचत गटाच्या कल्पना गायकवाड, तसेच सामाजिक कार्यकर्ते रेवणसिद्ध कारभारी आणि नागेश चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.सदर प्रकरणी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची अपेक्षा सामाजिक संस्था व नागरिकांनी व्यक्त केली आहे.






