नळदुर्ग परिसरात वासनांधांचा उच्छाद; दोन महिलांवर अत्याचार, आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल!
तुळजापूर (प्रतिनिधी): मोकाट सुटलेल्या लिंग पिसाट जनावरांना आवर घालण्याची वेळ आली आहे. नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांविरुद्धच्या अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. लग्नाचे आमिष दाखवून एका २७ वर्षीय महिलेवर वर्षभर अत्याचार केल्याची एक घटना, तर दुसऱ्या घटनेत २१ वर्षीय तरुणीला घरात गाठून तिच्यावर अत्याचार करत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे नोंदवले आहेत.
नळदुर्ग पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या एका गावातील २७ वर्षीय पीडित महिलेला त्याच गावातील एका तरुणाने लग्नाचे खोटे आमिष दाखवले. फेब्रुवारी २०२४ पासून ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत संबंधित आरोपीने पीडितेवर शेतात नेऊन वारंवार लैंगिक अत्याचार केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने नळदुर्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दाखल गुन्हे: पीडितेच्या फिर्यादीवरून दि. ०१ एप्रिल २०२६ रोजी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(एच)(एम), ३५१(२) सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (Atrocity Act) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना: घरात शिरून अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
दुसऱ्या घटनेत, दि. ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ च्या दरम्यान एका २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. पीडिता घरात असताना एका नराधमाने घरात प्रवेश केला आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे, तर ‘जर कोणाला काही सांगितले, तर तुझा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करीन’ अशी धमकीही आरोपीने दिली. या प्रकारामुळे पीडिता प्रचंड दहशतीत होती, मात्र धैर्याने तिने पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी दि. ०१ एप्रिल २०२६ रोजी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४, ११५(२), ३५१(२)(४), ३५२ आणि अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम ३(१)(डब्ल्यू)(i)(ii) व ३(२)(व्ही) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
एकाच दिवशी दोन गंभीर गुन्हे दाखल झाल्याने नळदुर्ग परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या दोन्ही प्रकरणांचा तपास गांभीर्याने सुरू केला असून, आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा नराधमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. नळदुर्ग पोलीस स्टेशन या पीडित महिलांना न्याय मिळवून देईल का? याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.






