*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही सामाजिक परिवर्तनाची क्रांतिकारी चळवळ – भैरवनाथ कानडे*
——————————————————-
जळकोट (अरुण लोखंडे )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेला केवळ बातमी देण्याचे माध्यम न ठेवता ती सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनाची प्रभावी चळवळ बनवली. ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’ आणि ‘जनता’ यांसारख्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी वंचित समाजाचा आवाज बुलंद केला आणि विचारांची क्रांती घडवून आणली, असे प्रतिपादन शिक्षक तथा प्रेरणादायी वक्ते भैरवनाथ कानडे यांनी केले.
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, ता.तुळजापूर यांच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पत्रकारितेतील योगदान” या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अरुण लोखंडे होते. तर प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती म्हणून पंचायत समिती सदस्य ॲड. आशिष गणेश सोनटक्के आणि परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक मारुती बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पंचायत समितीचे नूतन सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल ॲड. आशिष गणेश सोनटक्के यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल मारुती बनसोडे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.तर युवा कार्यकर्ते प्रविण जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या वेळी ॲड. आशिष सोनटक्के, मारुती बनसोडे व अरुण लोखंडे यांनीही आपले उद्बोधक विचार व्यक्त करत
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे समाजातील महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे एस.के. गायकवाड यांनी केले.
या कार्यक्रमास पत्रकार,किशोर धुमाळ, विजय पिसे, इरफान काझी, संजय पिसे, शामकांत नागीले, विठ्ठल सोनटक्के,सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ सोमोसे,नामदेव यादव,आरविद लोखंडे, जिवन गुळे सह नागरिक उपस्थित होते.






