Best News Portal Development Company In India

डोंबिवली पश्चिमेत आरोग्याशी खेळ! लेबलविरहित सुट्या दुग्धपदार्थांची मुक्त विक्री!

डोंबिवली पश्चिमेत आरोग्याशी खेळ! लेबलविरहित सुट्या दुग्धपदार्थांची मुक्त विक्री
प्रतिनिधी | डोंबिवली : उन्हाळ्याच्या हंगामात श्रीखंड, आमरस, बासुंदी सारख्या लोकप्रिय दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली असताना, डोंबिवली पश्चिम भागातील अनेक दुकानांमध्ये ‘सुट्या’ स्वरूपात विकल्या जाणाऱ्या या पदार्थांवर कोणतेही उत्पादन किंवा एक्सपायरी तारीख नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (उद्योग विभाग) ने अन्न सुरक्षा अधिकारी (FSO) यांच्याकडे तक्रार दाखल करून तातडीने संयुक्त कारवाईची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (उद्योग विभाग) च्या पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या पत्रात म्हटले आहे की, डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर (पश्चिम), गुप्ते रोड, सम्राट चौक, महात्मा फुले रोड, डॉ. नेमाडे गल्ली आणि देवी चौक परिसरातील अनेक दुकानांमध्ये हे पदार्थ विना लेबल विकले जात आहेत. FSSAI नियमांचे हे स्पष्ट उल्लंघन असून, ग्राहकांना मालाची ताजेपणा, घटक आणि मुदत याची कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. विशेषतः उन्हाळ्यात दूधजन्य पदार्थ लवकर खराब होत असल्याने ही बाब अत्यंत गंभीर आहे.
पत्रात नमूद करण्यात आले आहे की, “हे केवळ व्यावसायिक नियमांचे उल्लंघन नाही तर जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ आहे.” या पार्श्वभूमीवर पक्षाने तीन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. प्रथम, अन्न व औषध प्रशासन विभागाने वरील भागातील दुकानांची तपासणी करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (उद्योग विभाग) च्या पदाधिकाऱ्यांना पूर्वसूचना देऊन सोबत घ्यावे. दुसरे, नियमभंग करणाऱ्या दुकानदारांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तिसरे, प्रत्येक विक्रेत्याने मालाची ताजेपणा, उत्पादन तारीख व इतर आवश्यक माहिती दर्शविणारे फलक ग्राहकांना स्पष्ट दिसतील अशा ठिकाणी अनिवार्यपणे लावणे बंधनकारक करण्यात यावे.
मुंबई विभाग अध्यक्ष अश्विन संध्या हेमंतकुमार केळकर यांनी सांगितले, “जनतेच्या आरोग्याचे रक्षण ही आमची प्रथम जबाबदारी आहे. प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करावी. आमचा उद्योग विभाग यासाठी पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे.” मुंबई विभाग उपाध्यक्ष उदयराज तळेकर, सचिव दिपक जाधव आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष शाम चौगले यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याची ग्वाही दिली आहे.
या प्रकारामुळे स्थानिक ग्राहकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांनी सांगितले की, “सुट्या पदार्थ स्वस्त मिळतात म्हणून विकत घेतो, पण आरोग्य धोक्यात घालवायचे नाही.” अन्न सुरक्षा विभागाने लवकरात लवकर या परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india