दुधनाळ येथे तीन लाख भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्री शिव महापुराण कथेची सुरुवात….
आंतरराष्ट्रीय शिव कथावाचक पं. प्रदिप मिश्रा यांच्या वाणीतून शिव महापुराण कथेचा पहिला दिवस .
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उमरगा तालुक्यातील दुधनाळ येथील महादेव मंदिर परिसरात आयोजित केलेल्या श्री शिव महापुराण कथेची सुरुवात तीन लाख भाविक भक्तांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय कथावाचक पं. प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतून शिव कथेची सुरुवात बुधवार दि. २७ रोजी दुपारी २ ते ५ यावेळेत झाली आहे.
महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवरील लातूर जिल्ह्याचे शेवटचे टोक व धाराशिव जिल्ह्याचे शेवटचे टोक सीमावरती भागातील डोंगराळ परिसरात राजेंद्र पाटील कुटुंबाच्या वतीने शिहोर वाले आंतरराष्ट्रीय कथा वाचक पंडित मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत शिव महापुराण कथेचे वाचन सुरू झाले आहे.
यावेळी लातूर भाजपाचे सौ. अर्चना पाटील चाकूरकर, आमदार प्रवीण स्वामी, धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. उषाताई गायकवाड, अजिंक्य पाटील, भाजपा नेते प्रकाश आष्टे, उमरगा पंचायत समिती सदस्य दगडु पाटील, लातूर चे नेते बजरंग दादा जाधव, आयोजक राजेंद्र पाटील, विकास पाटील, प्रदिप पाटील, सागर पाटील, बसवराज अनंतराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य अप्पासाहेब पाटील, नाना मदनसुरे आदी. प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
या कथेत पं. मिश्रा भक्तांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, दुधानाळ या गावात कृष्ण परमात्मा चा अंश शिव या ठिकाणी आहे. महाराष्ट्र भूमी साधुसंतासह श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पावन भूमी आहे. आई तुळजाभवानी देवीने प्रसन्न होऊन राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना तलवार भेट देत रक्षण करण्याचे सामर्थ्य दिले आहे. शूर वीर मराठ्यांच्या भूमीमध्ये श्री शिवाजी महाराजांच्या परिसरात आई तुळजाभवानी या परिसरात अवतरली असून आई भवानीच्या भूमीमध्ये शिव कथा करण्याचे भाग्य लाभले आहे. मराठवाड्याच्या या दुर्गम भागात आत्तापर्यंत शिव कथा करण्याचे सामर्थ्य कोणाचेही झाले नाही. ते सामर्थ्य आयोजक राजेंद्र पाटील व पाटील परिवाराने करून दाखविली आहे. शिवशंकर महादेवाच्या प्रसन्न नगरीमध्ये शिवभजनाने सुरुवात झाली आहे.
मनुष्याला जन्म देणारा शिव परमात्मा आहे मनुष्याने खोटे बोलणे सोडून देणे गरजेचे आहे. शिव शंकराला खोटे बोलणारे कोण आहेत हे सर्व माहिती असते. जगामध्ये फक्त शिव शंकर महादेव हेच मनुष्याचे सर्व पापे नाहीसे करण्यास समर्थ आहे. महादेवाच्या पिंडीवर मनुष्याने जीवन जगत असताना एक तांब्या पाणी व तांदूळ अर्पण करणे त्याचबरोबर बेलपत्र वाहने गरजेचे आहे त्यामुळे मनुष्याला होणारी पीडा नाहीशी होते. मनुष्याच्या मनामध्ये दृढ विश्वास असेल तर भगवान शिव महादेव भक्तांचे कष्ट निवारण करतो.
या वेळी “तोडो ना काशी के गॉंव को आलो हमरी नजरीया” या शिव भजनाने भाविक भक्त मंञ मुग्ध होऊन नाचत होते. महादेवाच्या उदारतेमुळे महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांतील महादेव भक्तांना शासकीय नौकरी लागली आहे. भक्तांवर शिव शंकर भोलेनाथ यांची कृपा अपार असल्याचे सांगितले. विरशैव लिंगायत समाजाने पुरूषोत्तम मासात कथा ऐकली तर बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन झाल्याचे पुण्य मिळते असे म्हणाले. शिव कथा सांगण्यासाठी माता पार्वती ला अमरनाथ ला घेऊन जाताना अमर कथा सांगितली आहे. अमर गुफेत घेऊन जाऊन त्या अमरनाथ गुफेत पार्वती मातेला शिव कथा सांगितल्याचे सांगितले आहेत.
या कार्यक्रमाची सुरुवात आयोजक राजेंद्र पाटील व परिवाराने कलश व शिवकथा पुरानाचे पुजन करून केले. शेवटी आ. प्रवीण स्वामी, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. उषाताई गायकवाड व पाटील परिवाराने आरती करून पहिल्या दिवसाची सांगता केली. या वेळी तिन्ही पेंडाल भरून व बाहेर मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते. अंदाजे तीन लाखांपर्यंत महिला व पुरूष सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन हजार महिला व पुरुष स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले तर वाहतुक व शांतता सुरळीत ठेवण्यासाठी उमरगा पोलीस अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या ठिकाणी सकाळी व संध्याकाळी मोफत भोजनाची व्यवस्था आयोजकांनी केले आहेत.






