Best News Portal Development Company In India

लोककल्याण हीच खरी ‘शिवभक्ती’ उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

*लोककल्याण हीच खरी ‘शिवभक्ती’*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
शिवमहापुराणात भगवान शंकराचे वर्णन कल्याणकारी देव म्हणून केले जाते. शिव म्हणजे लोककल्याण. शिव म्हणजे अन्याय, असत्य आणि अहंकाराविरुद्ध उभे राहण्याची शक्ती. शिव म्हणजे स्वतःच्या कंठात विष धारण करून समाजाला अमृत देण्याची त्यागमय वृत्ती. शिव म्हणजे वंचितांच्या वेदनेशी समरस होणारी करुणा आणि सत्तेच्या उन्मादासमोर निर्भयपणे उभे राहण्याचे धैर्य.

लोकांच्या श्रमाच्या कररूपी पैशातून पोसल्या जाणाऱ्या लोकप्रतिनिधींनी लोकांच्या दुःखाशी एकरूप होणे, सत्तेत बसलेल्यांच्या मुजोरीविरुद्ध आवाज उठवणे, अन्यायग्रस्तांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरणे, जनतेच्या प्रश्नांसाठी रात्रंदिवस झटणे आणि प्रशासनावर प्रभावी पकड ठेवून जनहिताची कामे करून घेणे हीच खरी शिवभक्ती आहे.

शिवभक्ती केवळ कथा, प्रवचने, आरत्या किंवा धार्मिक सोहळ्यांपुरती मर्यादित नसते. ती समाजाच्या जखमांवर फुंकर घालण्यात असते. ती तहानलेल्या गावाला पाणी मिळवून देण्यात असते. ती अंधारात असलेल्या वस्तीपर्यंत वीज पोहोचवण्यात असते. ती शेतकऱ्याच्या, कामगाराच्या, विद्यार्थ्याच्या आणि सामान्य नागरिकाच्या संघर्षात सहभागी होण्यात असते.

शिव म्हणजे सत्य. आणि सत्याचा निर्भय स्वीकार करून त्यातच सौंदर्य, न्याय आणि लोककल्याणाचा बोध होणे म्हणजे शिवतत्त्वाचे खरे आकलन होय. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांपासून दूर राहून शिवभक्तीचा दावा करता येत नाही. जनतेच्या कल्याणासाठी झिजणे, संघर्ष करणे आणि परिवर्तनासाठी झटणे यालाच शिवभक्ती म्हणतात.

कारण मंदिरातील शिवलिंगाला वाहिलेल्या जलापेक्षा जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसणे अधिक पवित्र असते; आणि याच लोककल्याणाच्या मार्गात शिवत्वाचा खरा साक्षात्कार दडलेला असतो.

© ऍड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india