पोलिसी खाक्या दाखवताच तुळजापूर हादरले!
२ मटका अड्डे आणि २ अवैध ताडी केंद्रांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक, १४ संशयित ताब्यात, दोघे फरार !
तुळजापूर प्रतिनिधी :- “तुळजापूर शहरातील अवैद्य धंद्यावर पोलीस प्रशासनाची करडी नजर” धाराशीव जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता पूर्णपणे कंबर कसली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रीतु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी, ४ जून २०२६ रोजी तुळजापूर शहरात अवैधरित्या चालणाऱ्या २ मटका अड्ड्यांवर, २ अवैध ताडी विक्री केंद्रांवर आणि कोपटा (COTPA) कायद्यांतर्गत १ अशा एकूण ५ ठिकाणी एकाच वेळी धडक छापेमारी करण्यात आली. या धडाकेबाज कारवाईमुळे तुळजापूर परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे ‘प्लॅन’ यशस्वी
मिळालेल्या माहितीनुसार, परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांना तुळजापूर परिसरातील या अवैध अड्ड्यांबाबत खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अत्यंत गुप्तता पाळून ही योजनाबद्ध कारवाई करण्यात आली.
या धडक मोहिमेत श्री. अमोल मोहिते यांच्यासह:
सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुरेश कासुळे
सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रविण सोमवंशी
पोलीस उपनिरीक्षक (PSI) श्री. रामचंद्र बहुरे
क्युआरटी (QRT) पथक, आरसीपी (RCP) पथकातील पोलीस अंमलदार आणि चालक
यांनी महत्त्वाची भूमिका बजावत ही कारवाई यशस्वी केली. १४ संशयित रंगेहात ताब्यात, १३० लीटर ताडी नष्ट!
या एकाच वेळी झालेल्या धाडसत्रादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण १४ संशयितांना रंगेहात ताब्यात घेतले आहे, तर पोलिसांची चाहूल लागताच २ संशयित आरोपी फरार झाले. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेली एकूण अंदाजे १३० लीटर अवैध ताडी जागेवरच नष्ट केली आहे. फरार झालेल्या दोन्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चक्र फिरवली आहेत.
याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित संशयितांवर ‘महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७’ चे कलम १२ (अ), ‘महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम’ कलम ६५-इ व ८४, तसेच ‘कोपटा (COTPA) ॲक्ट’नुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
”धाराशिव जिल्ह्यात कोणत्याही प्रकाराचे अवैध धंदे, जुगार किंवा अवैध दारू-ताडी विक्री खपवून घेतली जाणार नाही. जिल्ह्यात कुठेही अवैध व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध यापुढेही अशीच अत्यंत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असा कडक इशारा पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
तुळजापूर शहरात अवैध धंद्यांना खतपाणी घालणाऱ्यांनवरती कारवाईसाठी हयगय केली जाणार नाही. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमधून मात्र समाधान व्यक्त होत आहे.






