Best News Portal Development Company In India

जयंती उत्सवाला सामाजिकतेची जोड; महालिंगरायवाडीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट छत्रपती संभाजीराजे जन्मोत्सवाचा युवा व्याख्याते लखन भोंडवे यांचे व्याख्यानाने समारोप !

जयंती उत्सवाला सामाजिकतेची जोड; महालिंगरायवाडीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट छत्रपती संभाजीराजे जन्मोत्सवाचा युवा व्याख्याते लखन भोंडवे यांचे व्याख्यानाने समारोप !

उमरगा / लोहारा प्रतिनिध आदिनाथ भालेराव.

उमरगा :- तालुक्यातील महालिंगरायवाडी येथे छत्रपती संभाजीराजे जन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्त उरलेल्या निधीतून राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. बुधवारी (दि. १७) रोजी शाळेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, कंपासपेटी व त्यातील आवश्यक साहित्य तसेच शाळा सुरू झाल्याच्या निमित्ताने खाऊचेही वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान सोमवंशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक ईश्वर नांगरे, उपसरपंच शाहूराज जाधव, प्रमुख व्याख्याते लखन भोंडवे, पत्रकार तथा इतिहास अभ्यासक मोहन जाधव, आनंद बागल, उपाध्यक्षा वसुधा चव्हाण, शिक्षणप्रेमी चंदाराणी घोरपडे, समिती सदस्य गोविंद भुसार, उत्सव समितीचे उपाध्यक्ष अमित जाधव, सचिव अर्जुन चव्हाण, किशोर रामतीर्थ आदी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजीराजे व राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली. यावेळी प्रमुख व्याख्याते लखन भोंडवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या पिढीने महापुरुषांच्या विचारांचा वारसा जतन करणे ही काळाची गरज आहे. अराजकता, स्वार्थ आणि मूल्यांचा ऱ्हास होत असलेल्या काळात छत्रपती संभाजी महाराजांसारख्या राष्ट्रपुरुषांचे विचारच समाजाला योग्य दिशा देऊ शकतात. शंभूराजेंचा दैदीप्यमान, शौर्यशाली आणि त्यागमय इतिहास हा तरुणांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत या साहित्याचा सदुपयोग करून स्वतःचे भविष्य घडवावे. उत्सव साजरा करण्याबरोबरच समाजाप्रती बांधिलकी जपणाऱ्या समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले पाहिजे. पत्रकार तथा इतिहास अभ्यासक मोहन जाधव यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आज अनेक उत्सव समित्या विविध उपक्रम राबवित असल्या तरी समाजोपयोगी कार्यातून वेगळेपण सिद्ध करणारे उपक्रम दुर्मिळ होत चालले आहेत. अशा परिस्थितीत छत्रपती संभाजीराजे जन्मोत्सव समितीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून शिक्षण क्षेत्राशी असलेली आपली सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली आहे. हा उपक्रम इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे.यावेळी बालाजी जाधव, बालाजी भालेराव, रब्बानी मुल्ला, निर्मला यादव, निर्मला भोसले यांच्यासह शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन बालाजी भालेराव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश सोमवंशी, हिराजी पवार, बालाजी सोमवंशी, राम घोरपडे, बालाजी घोरपडे, शुभम घोरपडे, बालाजी विनायक घोरपडे, विवेक जाधव, हरी घाडगे, मंथन चव्हाण, आकाश जाधव, शुभम जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले.छत्रपती संभाजीराजे जन्मोत्सव समितीने विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या सामाजिक उपक्रमाने प्रभावित होऊन गावचे उपसरपंच शाहूराज जाधव यांनी जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीमध्ये नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांची संपूर्ण घरपट्टी माफ करण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेला हा निर्णय ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरला असून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण म्हणून त्याचे कौतुक होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india