उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
*नाव नसलेला माणूस*
संध्याकाळ झाली की
तो
घराकडे निघतो.
त्याच्या खांद्यावर
दिवसभराचा थकवा असतो,
आणि
खिशात
उद्याची चिंता.
तो
कधी भाषण करत नाही.
क्रांतीची घोषणाही देत नाही.
त्याला
फक्त
उद्या पुन्हा
कामावर जायचं असतं.
त्याच्या हातावरच्या
रेषा
ज्योतिषाला
भविष्य सांगत नाहीत.
त्या
फावड्याचा दांडा,
विटेचा कोपरा,
लोखंडाची धार,
आणि
दोरीच्या घर्षणाने
लिहिलेल्या असतात.
शहर
त्याच्या नावाने
कधी ओळखलं जात नाही.
पण
शहरातल्या
इमारती
त्याच्या घामाने
उभ्या असतात.
तो
कधी
मंचावर नसतो.
पण
प्रत्येक मंच
उभारणाऱ्या
बांबूंवर
त्याच्या हाताचा
वास असतो.
तो
कधी
बातम्यांत येत नाही.
कारण
बातम्या
घटना शोधतात.
माणसं नाही.
त्याची मुलगी
शाळेत
निबंध लिहिते;
“माझे बाबा.”
तिथे
ती लिहित नाही,
की
त्यांचे गुडघे
नेहमी दुखतात.
की
ते
भाकरीचा
मोठा तुकडा
तिच्या ताटात ठेवतात.
की
ते
रात्री
सगळे झोपल्यावर
उद्याच्या खर्चाचा
हिशेब
एकटेच करतात.
मुलांना
आई-बाबांच्या
त्यागाचं व्याकरण
उशिरा समजतं.
एका दिवशी
तो
कामावर गेला नाही.
त्याच्या जागी
दुसरा माणूस आला.
काम
थांबलं नाही.
जग
थांबलं नाही.
पण
त्या घरात
संध्याकाळी
दार उघडल्याचा
जो आवाज
दररोज यायचा,
तो
पुन्हा
कधीच आला नाही.
इतिहास
राजांची नावं
लिहून ठेवतो.
घरं मात्र
अशा
नाव नसलेल्या
माणसांच्या
पावलांचे आवाज
आयुष्यभर
जपून ठेवतात.
© ऍड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)






