शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक; मुख्यमंत्री फडणवीसांच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान राजू शेट्टींच्या नेतृत्वात काढणार ‘सदबुद्धी यात्रा’!
तुळजापूर प्रतिनिधी :- शनिवारी विठुरायाला सरकारला सदबुद्धी दे म्हणून साकडे 13 जिल्ह्यातील शेतकरी साकडे घालणार . महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेल्या नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यातील शेतकरी आता अधिक आक्रमक झाले आहेत. या विनाशकारी महामार्गामुळे राज्यातील सुपीक शेतजमीन, बागायती क्षेत्र आणि शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त होणार असल्याने हा प्रकल्प पूर्णपणे रद्द करावा, या मागणीसाठी आंदोलनाचा पुढील टप्पा जाहीर करण्यात आला आहे.
आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील १३ जिल्ह्यांतील बाधित शेतकरी एकत्र आले असून, येत्या शनिवार, १८ जुलै २०२६ रोजी पंढरपूर येथील ऐतिहासिक वाकरी मैदान येथे सकाळी ११:०० वाजता शेतकऱ्यांची भव्य जाहीर सभा संपन्न होणार आहे. या सभेनंतर वाकरी ते विठ्ठल मंदिर अशी हजारो शेतकऱ्यांची भव्य ‘पायी सदबुद्धी यात्रा’ काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान विठूरायाला साकडे!
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपुरात येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील १३ जिल्ह्यांतील शेतकरी पंढरपुरात विठ्ठल चरणी एकत्र येत आहेत.
”शेतकऱ्यांची सोन्यासारखी सुपीक जमीन हिरावून घेणारा हा शक्तीपीठ महामार्ग राज्य सरकारने त्वरित रद्द करावा आणि मुख्यमंत्री महोदयांना हा विनाशकारी प्रकल्प रद्द करण्याची सुबुद्धी पांडुरंगाने द्यावी,” अशी सामूहिक मागणी आणि प्रार्थना या सदबुद्धी यात्रेच्या माध्यमातून शेतकरी विठूरायाकडे करणार आहेत.
१३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आणि गंभीर आरोप?
शक्तीपीठ महामार्गामुळे नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १३ जिल्ह्यांतील हजारो हेक्टर शेतजमीन संपादित केली जाणार आहे. यामुळे पिढ्यानपिढ्या शेती करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ आली आहे.
या महामार्गाची कोणतीही आवश्यकता नसताना, केवळ कंत्राटदार आणि भांडवलदारांच्या फायद्यासाठी व ५० हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी हा प्रकल्प शेतकऱ्यांवर लादला जात असल्याचा थेट आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
आंदोलनाची धार होणार तीव्र करणार-
यापूर्वीही या १३ जिल्ह्यांत विविध पातळ्यांवर मोर्चे, धरणे आंदोलने आणि ग्रामसभांमध्ये, तसेच जिल्हा परिषद व नगरपालिकांमध्ये महामार्गाविरोधात ठराव मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, सरकारने अद्याप हा प्रकल्प अधिकृतपणे आणि पूर्णपणे रद्द करण्याची घोषणा केलेली नाही. त्यामुळे आता आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यासाठी आषाढी वारीच्या पवित्र वातावरणात शेतकऱ्यांनी ‘पांडुरंग’ चरणी न्याय मागण्याचे ठरवले आहे. १८ जुलै रोजी वाकरी येथील सभेत आंदोलनाची पुढील दिशा आणि तीव्र आंदोलनाचा इशारा दिला जाणार आहे.
या सदबुद्धी यात्रेस राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती लाभणार आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने:
आमदार जयंत पाटील (नेते, राष्ट्रवादी काँग्रेस)
आमदार सतेज उर्फ बंटी पाटील (गटनेते, विधान परिषद)
खासदार धैर्यशील मोहिते पाटील
खासदार प्रणितीताई शिंदे
माजी मंत्री महादेव जानकर
आमदार कैलास पाटील
कॉम्रेड गिरीश फोंडे
यांच्यासह वरील सर्व जिल्ह्यातील शक्तीपीठ विरोधी विविध पक्षांचे आमदार आणि खासदार या यात्रेस उपस्थित राहणार आहेत.
’चलो पंढरपूर’चे आवाहन- हा लढा केवळ जमीन वाचवण्याचा नसून शेतकऱ्यांचे अस्तित्व, संस्कृती आणि रोजगार वाचवण्याचा आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग बाधित १३ जिल्ह्यांतील सर्व शेतकरी बांधव, कष्टकरी, महिला आणि तरुण शेतकऱ्यांनी १८ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजता वाकरी (पंढरपूर) येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी समन्वय समिती आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने राजू शेट्टी यांनी केले आहे.






