‘श्री अन्ना’तून आरोग्य, रोजगार अन् समृद्धीचा मार्ग; तुळजापूर येथील क्षमता बांधणी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
तुळजापूर प्रतिनिधी :- “हवामान बदलाच्या काळात ‘श्री अन्न’ म्हणजेच भरडधान्य हे केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर ग्रामीण भागात रोजगार आणि आर्थिक समृद्धीचे मोठे साधन बनू शकते. संशोधक, उद्योजक आणि विस्तार यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांच्या प्रगतीला निश्चितच नवी दिशा मिळेल,” असा विश्वास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी व्यक्त केला.
तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित ‘भरडधान्य (मिलेट) लागवड, प्रक्रिया व मूल्यवर्धन’ या विषयावरील क्षमता बांधणी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते ऑनलाइन मार्गदर्शन करत होते.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) अंतर्गत असलेले कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर आणि मिलूप फूड्स प्रा. लि. (बार्शी) यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या नाविन्यपूर्ण उपक्रमाला जिल्ह्यातील शेतकरी, महिला आणि तरुण उद्योजकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, सुमारे ११५ हून अधिक प्रशिक्षणार्थींनी यामध्ये सहभाग नोंदवला.
समन्वयातून भरडधान्य क्षेत्र वाढवण्याचे आवाहन
कार्यक्रमात बोलताना विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी मराठवाडा भागात भरडधान्याचे क्षेत्र आणि उत्पादन वाढवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने व नियोजनबद्ध रीतीने काम करण्याचे आवाहन केले.
रब्बी ज्वार संशोधन केंद्र (सोलापूर) चे शास्त्रज्ञ डॉ. परशुराम पात्रोटी यांनी या कार्यशाळेत शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. भरडधान्याचे केवळ उत्पादन न घेता, त्यावर प्रक्रिया करून बिस्किटे, शेवया, पीठ यांसारखी मूल्यवर्धित उत्पादने तयार केल्यास बाजारात कसा चांगला भाव मिळू शकतो, याबद्दलचे आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले.
शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकात केव्हीकेच्या कामाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील शेतकरी, युवक आणि महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी केव्हीकेच्या वतीने सातत्याने विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणांचा प्रत्यक्ष लाभ घेऊन स्वतःचे उद्योग सुरू करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यशाळेला कसबे तडवळा येथील प्रगतशील शेतकरी महेश जमाले यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर, कृषी तज्ज्ञ आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. या कार्यशाळेमुळे जिल्ह्यात भरडधान्य लागवड आणि प्रक्रियेला मोठी गती मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.






