धाराशिव जिल्ह्यातील वगळलेल्या १४ महसूल मंडळांना तातडीने पीक नुकसान भरपाई द्या; अन्यथा तीव्र आंदोलन करणार!
– आमदार प्रविण स्वामी यांची कृषी सचिवांकडे पत्राद्वारे मागणी
उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
खरीप २०२५ मधील पीक नुकसान भरपाई देताना धाराशिव जिल्ह्यातील वगळलेल्या १४ महसूल मंडळांचा समावेश करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मंजूर करावी, अशी आग्रही मागणी उमरगा-लोहारा मतदार संघाचे आमदार प्रविण विरभद्रय्या स्वामी यांनी राज्य शासनाकडे केली आहे. याबाबत त्यांनी माननीय कृषी सचिव तथा अध्यक्ष, तांत्रिक समिती (पीक विमा), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना थेट पत्र पाठवून तातडीने बैठक घेण्याची विनंती केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
*प्रमुख बाबी खालीलप्रमाणे आहेत*
१) खरीप २०२५ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील २ लाख ६६ हजार शेतकऱ्यांनी एकूण ४ लाख ९३ हजार अर्जांद्वारे पीक विमा भरला होता. मात्र, राज्य शासनाच्या नवीन पीक विमा योजनेतील तांत्रिक अटींमुळे जिल्ह्यातील लाखो शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले आहेत.
२) नवीन योजनेनुसार, पीक कापणी प्रयोगाद्वारे ५० टक्के आणि तांत्रिक उत्पादनावर आधारित ५० टक्के रक्कम देण्याची तरतूद आहे. तांत्रिक निकषांवर आधारित उत्पादन जास्त आल्याचे दाखवून धाराशिव जिल्ह्यातील १४ महसूल मंडळांना पीक नुकसान भरपाईतून पूर्णपणे वगळण्यात आले आहे. हा शेतकऱ्यांवर अत्यंत मोठा अन्याय आहे.
३) परभणी येथील कृषी शास्त्रज्ञांनी या भागात प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान भरपाई देणे योग्य असल्याचा अहवाल दिला आहे. तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनीही दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
४) गेल्या वर्षी धाराशिव जिल्ह्यात सरासरीपेक्षा तब्बल १६१ टक्के अधिक पाऊस झाला होता. अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. असे असूनही, लोहारा तालुक्यातील माकणी, जेवळी, आणि धानोरी ही तीन महसूल मंडळे वगळली गेली आहेत. विशेष म्हणजे शेजारच्या लोहारा महसूल मंडळाला मदत मिळाली, मात्र जवळच असलेल्या सास्तूर, माकणी व जेवळी मंडळांना डावलण्यात आले, ही बाब अत्यंत अन्यायकारक व चीड आणणारी आहे.
५)परभणी येथील कृषी शास्त्रज्ञांच्या अहवालाचा आधार घेऊन, धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याच्या रकमेपासून वंचित राहिलेल्या या १४ महसूल मंडळांना मदत देण्यासाठी राज्य तांत्रिक समितीची तातडीने बैठक घेण्यात यावी, अशी मागणी आमदार स्वामी यांनी केली आहे.
(“अतिवृष्टीमुळे होरपळलेल्या धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम या तांत्रिक निकषांमुळे झाले आहे. तांत्रिक समितीने तातडीने बैठक घेऊन शेतकऱ्यांवरील हा अन्याय दूर करावा, अन्यथा आम्हाला शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करावे लागेल.”)
—श्री प्रविण विरभद्रय्या स्वामी (आमदार, उमरगा – लोहारा विधानसभा मतदारसंघ)







