पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे तुळजापूर तालुक्यात सोयाबीन करपले; तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी!
तुळजापूर प्रतिनिधी :-
तालुक्यात गेल्या तब्बल दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनसह इतर खरीप पिके पूर्णपणे करपण्याच्या मार्गावर आहेत. सोयाबीनच्या वाढीच्या आणि शेंगा भरण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यातच पावसाचा खंड पडल्यामुळे पाने वाळू लागली असून उत्पादनात घट होण्याची तीव्र भीती व्यक्त होत आहे. या संकटामुळे महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे शेतांची पाहणी करून नुकसानीचे तातडीने गावनिहाय व शेतनिहाय पंचनामे करावेत, अशी जोरदार मागणी काक्रंबा पंचायत समिती सदस्य किसन देडे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजुरीवर केलेला मोठा खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या-
तात्काळ पंचनामे- महसूल व कृषी विभागाने शेतावर जाऊन नुकसानीचे गावनिहाय व शेतनिहाय संयुक्त पंचनामे करावेत.
आर्थिक मदत व पीक विमा- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी नियमानुसार तातडीने आर्थिक मदत देऊन पीक विम्याचा लाभ मिळवून द्यावा.
दुष्काळसदृश उपाययोजना- परिस्थिती गंभीर असलेल्या गावांची विशेष पाहणी करून दुष्काळसदृश निकषांनुसार तातडीने उपाययोजना लागू कराव्यात.
आगामी हंगामासाठी पाठबळ- येत्या पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खतांची विशेष मदत उपलब्ध करून द्यावी.





