श्री तुळजाभवानी देवीच्या ऑक्टोबर २०२६ मधील ‘सिंहासन पूजे’साठी ऑनलाईन नोंदणीचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून सुरू होणार प्रक्रिया!
तुळजापूर प्रतिनिधी:-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा व इतर विविध राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक कुलधर्म आणि कुलाचार करण्यासाठी तुळजापूर येथे येत असतात. श्री तुळजाभवानी देवीची ‘सिंहासन पूजा’ ही भाविकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची व श्रद्धास्थानाची मानली जाते. आगामी ऑक्टोबर २०२६ या महिन्यातील सिंहासन पूजेच्या ऑनलाईन नोंदणीचे अधिकृत वेळापत्रक श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
भाविकांना मंदिर संस्थानच्या – https://online.shrituljabhavani.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपली सिंहासन पूजा नोंदवता येणार आहे.
ऑनलाईन नोंदणी व सोडतीचे (ड्रॉ) सविस्तर वेळापत्रक-
सिंहासन पूजा नोंदणी- १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपासून ते २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपर्यंत भाविकांना ऑनलाईन नोंदणी करता येईल.
प्रथम सोडत (१ली फेरी)- २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता ऑनलाईन ड्रॉ पद्धतीने पहिली सोडत काढून निवड झालेल्या भाविकांना पेमेंटसाठी SMS पाठवला जाईल.
प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट- २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून ते २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपर्यंत पेमेंट करणे आवश्यक राहील.
द्वितीय सोडत (२री फेरी)- पहिल्या फेरीत संख्या पूर्ण न झाल्यास २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता दुसरी सोडत काढून SMS पाठवला जाईल.
द्वितीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट- २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० ते २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपर्यंत पेमेंटची मुदत असेल.
तृतीय सोडत (३री फेरी)- पहिल्या दोन फेऱ्यांनंतरही जागा रिक्त राहिल्यास २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता तिसरी सोडत काढली जाईल.
तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट- २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० ते ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपर्यंत पेमेंट करता येईल.
अंतिम यादी प्रसिद्धी- माहे ऑक्टोबर २०२६ मधील अंतिम बुकिंग झालेल्या भाविकांची यादी ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता (१७:०० वा.) अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
महत्त्वाची टीप (मंचकी निद्रेमुळे ‘या’ दिवशी सिंहासन पूजा बंद राहील)-
मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात श्री देवीजींच्या मंचकी निद्रेचा काळ असल्याने खालील कालावधीत सिंहासन पूजा पूर्णपणे बंद राहतील.
दिनांक ०४ ऑक्टोबर २०२६ ते १० ऑक्टोबर २०२६
दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ ते २५ ऑक्टोबर २०२६
मंदिर प्रशासनाचे भाविकांना आवाहन-
सर्व भाविकांनी कोणत्याही मध्यस्थांवर विश्वास न ठेवता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत https://online.shrituljabhavani.org या संकेतस्थळाला भेट देऊन वेळेत आपली ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावी व या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर (माया माने) यांच्या वतीने करण्यात आले आहे. 







