श्री तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा रक्षकाचा प्रामाणिकपणा; ११ हजार रोकड अन् चांदीची चैन भाविकाला केली सुपूर्द!
तुळजापूर प्रतिनिधी :-
श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे आणि प्रामाणिकपणामुळे एका भाविकाची हरवलेली ऐवज व रोख रक्कम सुरक्षितपणे परत मिळाली आहे. मंदिर परिसरातील आरती पॉईंटजवळ कर्तव्यावर असताना सुरक्षा रक्षक स्वामी बसय्या यांना एक बेवारस पर्स आढळून आली होती.
पर्सची पाहणी केली असता त्यात ११,९७९ रुपये रोख रक्कम आणि एक चांदी सदृश्य चैन असल्याचे निदर्शनास आले. सुरक्षा रक्षकांनी पर्समधील कागदपत्रे व उपलब्ध माहितीच्या आधारे तातडीने शोध घेऊन संबंधित भाविकाशी संपर्क साधला. ही पर्स नातेपुते (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील भाविक सौ. माधुरी सतीश इंगोले यांची असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर आवश्यक पडताळणी करून ही रोख रक्कम आणि चांदीची चैन भाविक माधुरी इंगोले यांच्या स्वाधीन करण्यात आली. आपली हरवलेली पर्स सुरक्षितपणे परत मिळाल्याने भाविकाने मंदिर प्रशासन व सुरक्षा कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या प्रसंगी सुपरवायझर कमलाकर पवार, अनिल लोखंडे यांच्यासह इतर सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते. सुरक्षा रक्षक स्वामी बसय्या यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे मंदिर प्रशासनासह सर्व भाविकांमधून कौतुक होत आहे.






