Best News Portal Development Company In India

कोळेकरवाडीत श्री धुळोबा-बिरोबा मंदिर जीर्णोद्धाराचा श्रीगणेशा; वेदोक्त मंत्रोच्चारात व ढोलांच्या गजरात भूमिपूजन संपन्न!

कोळेकरवाडीत श्री धुळोबा-बिरोबा मंदिर जीर्णोद्धाराचा श्रीगणेशा; वेदोक्त मंत्रोच्चारात व ढोलांच्या गजरात भूमिपूजन संपन्न!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
​तुळजापूर तालुक्यातील कोळेकरवाडी (काक्रंबावाडी) येथील ग्रामदैवत श्री क्षेत्र धुळोबा-बिरोबा देवस्थानच्या भव्य मंदिर जीर्णोद्धार व नूतनीकरण कार्याचा शुभारंभ आज अतिशय उत्साहपूर्ण आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. पुरोहितांच्या वेदोक्त मंत्रोच्चारात आणि ढोल-ताशांच्या गजरात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

​या ऐतिहासिक आणि धार्मिक कार्यासाठी नुकतीच कोळेकरवाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत श्री क्षेत्र आरेवाडी व धुळदेव दरबारात जाऊन विधिवत कौल लावून देवाचा आशीर्वाद व संमती घेतली होती. यानंतर आज सकाळी शुभमुहूर्तावर पुरोहितांच्या उपस्थितीत वेदघोषात देवाच्या मूळ तांदळ्याचे शास्त्रोक्त पूजन करून ते सुरक्षित स्थानी उत्थापित (हलवण्यात) करण्यात आले.

​त्यानंतर विधिवत टिकाव चालवून व पाया खांदून नवीन मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी मंदिराचे वीरकरी आदरणीय तात्या महाराज यांनी हातात भंडारा घेऊन पारंपरिक पद्धतीने सर्व देवतांचे आवाहन केले. भूमिपूजनाचा मुहूर्त साधत तरुण मंडळाने पारंपरिक ढोल वाजवून व भंडारा उधळून जोरदार जल्लोष केला.

​या मंगलमयी सोहळ्यास गावातील ज्येष्ठ नागरिक, पोलीस पाटील, तरुण कार्यकर्ते, महिला भगिनी आणि समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे मंदिर लवकरात लवकर पूर्णत्वास नेऊन मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्याचा दृढ संकल्प सर्व ग्रामस्थांनी या प्रसंगी व्यक्त केला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india