मनसेच्या पाठपुराव्याला यश! सोयाबीनच्या नुकसानीनंतर सरसकट दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
पीक पंचनामे, विमा आणि तातडीच्या मदतीसाठी मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; प्रशासनाकडून त्वरित कार्यवाहीचे निर्देश.
तुळजापूर प्रतिनिधी :-
चालू खरीप हंगामात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी भीषण आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने करण्यात आलेल्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले असून, प्रशासनाने ‘सरसकट दुष्काळ’ जाहीर करत तातडीने नुकसान भरपाईची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांकडे केली होती तातडीच्या मदतीची मागणी-
खरीप पिकांच्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी, यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले होते. या निवेदनात.
बाधित शेतपिकांचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात यावेत.
मंजूर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा व्हावी.
संकटात सापडलेल्या बळीराजाला तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी.
या प्रमुख मागण्या प्रशासनासमोर ठामपणे मांडण्यात आल्या होत्या. प्रशासनाकडून दखल; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित.
मनसेच्या या निवेदनाची आणि मागणीची गांभीर्याने दखल घेत संबंधित प्रशासनाने ‘सरसकट दुष्काळ’ अशी घोषणा केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबतची सर्व आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. प्रशासनाच्या या निर्णयामुळे नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
”शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल. संकटसमयी बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव खंबीरपणे पाठीशी उभी राहील.”
मनसे पदाधिकाऱ्यांकडून निर्णयाचे स्वागत
प्रशासनाकडून मिळालेल्या या सकारात्मक आणि जलद प्रतिसादाबद्दल धाराशिव जिल्हा मनसेच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे. या निर्णयाचे मनसे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, तुळजापूर तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे, सोमेश्वर आलुरे, समीर शेख यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील सर्व मनसे पदाधिकारी व स्थानिक शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत केले आहे.






