*नशामुक्त समाजनिर्मिती ही प्रत्येक नागरिकांची सामुहिक जबाबदारी आहे.* —-
*प्रा.डाॅ.व्ही.एस.सुर्यवंशी*
========================
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
येथील श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज “नशामुक्त भारत सप्ताह” या उपक्रमाअंतर्गत एका विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले होते. तर प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ.व्ही.एस. सुर्यवंशी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.मनोरंजना निर्मळे यांनी केले. यावेळी ‘नशामुक्त भारत’ या विषयांवर घेण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना पाॅवर पाॅईंटच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.व्ही.एस.सुर्यवंशी यांनी असे सांगितले की, “औषधांचा योग्य वैद्यकीय सल्ल्याशिवाय होणारा वापर तसेच मादक (अंमली) पदार्थांचे सेवन, गैरवापर आणि व्यसन ही केवळ वैयक्तिक समस्या नसून त्याचे गंभीर सामाजिक परिणाम होतात. सुरुवातीला कुतूहल, मित्रांचा दबाव, तणाव, नैराश्य, चुकीची संगत किंवा प्रयोग म्हणून सुरू झालेली सवय पुढे व्यसनाचे रूप धारण करू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी अशा पदार्थांपासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
अंमली पदार्थांचा गैरवापर व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक संतुलनावर, निर्णयक्षमतेवर आणि दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम करू शकतो. त्यामुळे व्यक्तीचे शिक्षण, करिअर, कौटुंबिक संबंध आणि सामाजिक जीवन उद्धवस्त होऊ शकते.व्यसनामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे केवळ शिस्तभंगाच्या दृष्टीने न पाहता त्यामागील कारणे समजून घेणे, योग्य मार्गदर्शन करणे आणि गरज असल्यास तज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.
विद्यार्थी जीवन ही व्यक्तिमत्त्व विकासाची आणिभविष्यातील ध्येय निश्चित करण्याची महत्त्वपूर्ण अवस्था आहे. या काळात युवकांनी आपली ऊर्जा शिक्षण, संशोधन, क्रीडा, कला, साहित्य, सामाजिक कार्य आणि इतर विधायक उपक्रमांकडे वळवावी. चांगली संगत, सकारात्मक विचारसरणी, नियमित दिनचर्या आणि कुटुंब व शिक्षकांचे मार्गदर्शन हे व्यसनापासून दूर राहण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत.
नशामुक्त समाज निर्मिती ही केवळ शासनाची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. पालकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधावा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी आणि विद्यार्थ्यांनीही आपल्या मित्रपरिवारांमध्ये नशाविरोधी संदेश पोहोचवावा. व्यसनाधीन व्यक्तीची टिंगल किंवा सामाजिक बहिष्कार करण्याऐवजी तिला योग्य समुपदेशन, उपचार आणि पुनर्वसनासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. ‘नशेला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार’ हा संदेश केवळ घोषवाक्य न राहता प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनाचा संकल्प बनला पाहिजे.
आजची जागरूक तरुण पिढीच उद्याचा सुदृढ, सक्षम आणि व्यसनमुक्त समाज घडवू शकते. त्यामुळे प्रत्येकाने अंमली पदार्थांना ठामपणे नकार देऊन स्वतःच्या आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्यावे.” असे त्यांनी प्रतिपादन केले. यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागांचे विद्यार्थी आणि व्याख्यात्यांमध्ये प्रश्नोत्तरे रंगली. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.संजय अस्वले यांनी देखील विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहून व्यक्तीमत्व विकास साधावा, तरच ख-या अर्थाने देश नशामुक्त होऊन विकासाला चालना मिळेल असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष जाधव यांनी केले .तर प्रा.डॉ.परमेश्वर चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले.यावेळी उपप्राचार्य डॉ.विनोद देवरकर, कार्यक्रमाधिकारी डॉ.भरत शेळके, डॉ.प्रदीप पाटील, डॉ.मनोरंजना निर्मळे, प्रा.संतोष जाधव प्रा. डॉ.परमेश्वर चव्हाण,प्रा.महेश जोशी, प्रा. बालाजी सुरवसे, प्रा.वर्षा हुलगुंडे, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







