‘धीर खचू देऊ नका, आत्महत्येचा विचारही आणू नका!’ : तुळजापूरच्या खानापुरात सोयाबीनची पोकळ शेंग अन् चिमुकल्याचे अश्रू पाहून आदित्य ठाकरे भावुक.
शेताच्या बांधावर बसून ऐकल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा.
एकरी २५ हजारांचा खर्च पाण्यात; हातात फक्त दाणेविरहित सोयाबीन.
“माझे पप्पा आत्महत्या करतील…” चिमुकल्याच्या शब्दांनी परिसर गहिवरला.
दुष्काळावर राजकारण नको, तात्काळ विशेष अधिवेशन बोलवा; आदित्य ठाकरेंची मागणी
तुळजापूर प्रतिनिधी:-
“शेतकऱ्यांनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, धीर खचू देऊ नका. स्वतःचे बरे-वाईट करण्याचा किंवा आत्महत्येचा प्रयत्न करू नका; असा विचारही मनात आणू नका,” असे अत्यंत भावनिक आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी केले. तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथे दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या ठाकरे यांनी थेट शेताच्या बांधावर बसून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
पाहणी दौऱ्यादरम्यान पीक हातातून गेल्याचे दुःख, कर्जाचा वाढता डोंगर, मुलांच्या शिक्षणाची चिंता आणि औषधोपचाराचा खर्च कसा भागवायचा, या विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्यांचे व्यथित चित्र समोर आले.
हातात सोयाबीनच्या बिया… अन् दाणाच नाही!
खानापूर येथील शेतात ठाकरे पोहोचताच शेतकऱ्यांनी आपल्या अडचणींचा पाढा वाचला. एका शेतकऱ्याने शेतातील सोयाबीनची शेंग आदित्य ठाकरे यांच्या हातात देऊन ती फोडण्याची विनंती केली. ठाकरे यांनी शेंग फोडून पाहिली असता त्यात एकही दाणा नव्हता.
“एकरी सुमारे २५ हजार रुपये खर्च झाला आहे. आता शेतातून एक रुपयाही मिळणार नाही. वर्षभर कुटुंब कसे चालवायचे? मुलांचे शिक्षण, औषधोपचार, मुला-मुलींची लग्ने आणि रब्बीची पेरणी कशी करायची?” असा आर्त सवाल शेतकऱ्यांनी केला.
“बाबा आत्महत्या करतील…” चिमुकल्या सय्यदच्या शब्दांनी वातावरण गहिवरले
संवादादरम्यान सय्यद बेग हा चिमुकला आपल्या वडिलांसोबत तेथे आला होता. ठाकरे यांनी त्याला जवळ घेऊन विचारपूस केली असता मुलाच्या डोळ्यात पाणी आले.
चिमुकल्या सय्यदची व्यथा-
“साहेब, शाळेची फी भरण्यासाठी पैसे नाहीत. माझे वडील आत्महत्या करण्याची शक्यता आहे. मी काय करू, मला कळत नाही.”
मुलाच्या वडिलांनी सांगितले की, शेतात काहीच पिकलेले नाही. फीचे पैसे मागितल्यावर “पैसे नाहीत, आता आत्महत्या करावीशी वाटते” असे सहज उच्चारलेले वाक्य मुलाच्या मनात घर करून गेले. तेव्हापासून मुलगा २४ तास वडिलांच्या अवतीभवती राहतो, रात्री अचानक उठून चिंता करतो आणि शाळेत जाण्याऐवजी शेतात वडिलांसोबत येतो. पोटाच्या आजारावरील उपचारासाठीही पैसे नसल्याचे सांगत त्यांनी तातडीच्या शासकीय मदतीची मागणी केली.
‘आमचं राहू द्या; मुक्या जनावरांचं तरी बघा!’
दुष्काळामुळे केवळ शेतीचेच नव्हे, तर पिकांसोबत पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्नही बिकट झाला आहे. “आमचे कसेबसे होईल, पण मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. आम्हाला चारा छावण्या नकोत, आमच्या थेट बांधावर चारा उपलब्ध करून द्या,” अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच जुनी कर्जमाफी आणि पीकविमा अद्याप मिळाला नसून बँकांकडून वसुलीच्या नोटिसा येत असल्याच्या तक्रारीही मांडल्या.
‘दुष्काळावर राजकारण नको, केंद्राचा निधी वापरा’ आदित्य ठाकरे.
शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.
विशेष अधिवेशनाची मागणी- दुष्काळाचे संकट केवळ शेतीपुरते मर्यादित नसून संपूर्ण ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे आहे. यासाठी सरकारने तात्काळ विशेष अधिवेशन बोलवावे.
केंद्राच्या निधीचा वापर- पंतप्रधान फंडातील पैसा आणि केंद्राचा निधी या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी का वापरला जात नाही?
मुख्यमंत्र्यांनी बांधावर जावे- मुख्यमंत्र्यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना प्रत्यक्ष काय आणि कधी मदत मिळणार, हे स्पष्ट करून धीर दिला पाहिजे.
बँकांना इशारा- बँकांनी शेतकऱ्यांना नोटिसा देऊन त्रास देणे थांबवावे, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल.
पर्यावरणाकडे लक्ष द्या. दुष्काळाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर जंगलतोड थांबवून पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती.
या पाहणी दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, नंदूराजे निंबाळकर, संजय निंबाळकर, शामल पवार, श्याम पवार, सुधीर कदम, राज अहमद पठाण, धुळापर राक्षे, कमलाकर चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कानडे, सुनील जाधव, जगन्नाथ गवळी यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








