नेदरलँडमध्ये सोयाबीन तेल निर्यातीचे आमिष! तुळजापूरच्या संस्थेला ६.७५ लाखांचा गंडा; नोएडामधील चौघांवर गुन्हा दाखल!
आंतरराष्ट्रीय कागदपत्रांच्या नावाखाली उकळले पैसे; ‘एंकाश ग्लोबल’च्या मालकांसह चौघांवर तामलवाडी पोलिसांत कारवाई.
तुळजापूर प्रतिनिधी:-
युरोपीय देशात (नेदरलँड) सोयाबीन फूड ऑईलची निर्यात करून देण्याचे आणि त्यासाठी आवश्यक आंतरराष्ट्रीय कागदपत्रे बनवून देण्याचे आमिष दाखवून, मसला खुर्द (ता. तुळजापूर) येथील कृषी संस्थेची तब्बल ६ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नोएडा (उत्तर प्रदेश) येथील चार जणांविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणविर सिंग, आकांक्षा, भुपेंद्र सिंग आणि रिया ठाकूर (सर्व रा. नोएडा, उत्तर प्रदेश; ‘एंकाश ग्लोबल’चे मालक व प्रतिनिधी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मसला खुर्द येथील ‘रामकृष्ण हरी कृषी व पणन सेवा सहकारी संस्था मर्यादित’चे संचालक सुदर्शन गोरख जाधव यांचे सुपुत्र विवेकानंद सुदर्शन जाधव (वय २०, रा. मसला खु.) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी ३ डिसेंबर २०२५ ते २७ डिसेंबर २०२५ या कालावधीत फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांचा विश्वास संपादन केला. संस्थेचे सोयाबीन फूड ऑईल नेदरलँडला (युरोप) निर्यात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कागदपत्रे तयार करून देण्याचे आश्वासन आरोपींनी दिले होते.
या कामाच्या बहाण्याने आरोपींनी ‘एंकाश ग्लोबल’ कंपनीशी संबंधित मोहित शर्मा याच्या ‘आयडीएफसी बँक’ (नोएडा शाखा) खात्यावर वेळोवेळी आरटीजीएस (RTGS) आणि यूपीआय (UPI) द्वारे एकूण ६,७५,००० रुपये भरण्यास भाग पाडले.
पैसे उकळल्यानंतरही आरोपींनी कोणतेही काम केले नाही किंवा पैसे परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विवेकानंद जाधव यांनी तामलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दिलेल्या प्रथम खबरेवरून (FIR) २५ सप्टेंबर २०२६ रोजी तामलवाडी पोलिसांत आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(२), ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तामलवाडी पोलीस करत आहेत.







