ढोकीतील जिल्हा फळरोप वाटिकेत राडा! कृषी अधिकाऱ्याला धक्काबुक्की व कर्मचाऱ्यांचे कपडे फाडले; २२ जणांवर गुन्हा दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी:-
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील शासकीय ‘जिल्हा फळरोप वाटिका’ येथे बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून शासकीय कामात अडथळा आणल्याची व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. कृषी अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून रखवालदारांचे कपडे फाडत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी २२ जणांवर ढोकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत (BNS) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते १०.०० वाजेच्या सुमारास ढोकी येथील जिल्हा फळरोप वाटिकेत कृषी अधिकारी शशिकांत लक्ष्मण बारबोले (वय ५६, मूळ रा. बार्शी, हल्ली रा. ढोकी) हे आपले शासकीय कामकाज करत होते. त्यावेळी स्थानिक पारधी समाजातील संशयित आरोपींनी फळरोप वाटिकेच्या परिसरात बेकायदेशीरपणे प्रवेश करून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी कृषी अधिकारी बारबोले यांनी विरोध दर्शवला असता, आरोपींनी त्यांच्या शर्टला धरून ओढत धक्काबुक्की केली आणि त्यांना शासकीय कर्तव्यापासून परावृत्त केले.
रखवालदारांना मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी.
यावेळी रोपवाटिकेत तैनात असलेले रखवालदार गजेंद्र परीट, गणेश गडकर आणि निलेश पुदाले हे मध्यस्थी करण्यासाठी गेले असता, आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी रखवालदारांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांना अवाच्य भाषेत शिवीगाळ व मारहाण केली, तसेच जिवे मारण्याची थेट धमकी दिली.
तोळाबाई बाबासाहेब चव्हाण, साखरबाई सुनिल चव्हाण, शेवंताबाई रामदास चव्हाण, पिंकी महादेव शिंदे, गायाबाई बालाजी काळे, सखुबाई बजरंग चव्हाण, सविता भिमा काळे, लताबाई लाला काळे, जनाबाई दिलीप चव्हाण, सुमनबाई गोविंद शिंदे, पदमीनबाई दत्ता चव्हाण, रेखाबाई विलास चव्हाण, जनाबाई नवसाजी चव्हाण, मालनबाई बप्पा चव्हाण, लता वसंत शिंदे, मनिषा पप्पु चव्हाण, शाहुबाई बाबु पवार, सुनिता सुभाष चव्हाण, तोळाबाई नाना चव्हाण, अरुण चव्हाण (सर्व रा. ढोकी, ता. जि. धाराशिव) व इतर.
कृषी अधिकारी शशिकांत बारबोले यांनी दिलेल्या प्रथम खबर (FIR) वरून ढोकी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १२१(१), १३२, १८९(२), १९१(२), १९०, ३२९(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, ढोकी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






