*अँड. शीतल चव्हाण फाउंडेशनचे ‘बळीराजा आधार अभियान २०२६ २७’*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
*उमरगा व लोहारा तालुक्यात पुढील पेरणी हंगामापर्यंत चालणार अभियान; १ ऑक्टोबरला प्रारंभ, गांधी जयंतीपासून गावभेटी तर २० ऑक्टोबरला उमरगा, मुरूम व लोहारा येथे ‘दसरा विवेकयात्रा’*
उमरगा : मागील वर्षी अतिवृष्टीच्या संकटात गरजू कुटुंबांना मदतीचा हात देणाऱ्या ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगाच्या वतीने यंदाच्या कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उमरगा व लोहारा तालुक्यात ‘बळीराजा आधार अभियान २०२६ २७’ राबविण्यात येणार आहे. ‘आज आधार… उद्यासाठी पाणी… पुढच्या पेरणीसाठी बळ!’ हे या अभियानाचे ब्रीदवाक्य असून दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि गरजू कुटुंबांना पुढील पेरणी हंगामापर्यंत विविध माध्यमांतून आधार देण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात येणार आहे.
मागील वर्षी अतिवृष्टीच्या काळात फाउंडेशनने दसऱ्याच्या निमित्ताने काढलेल्या ‘विवेकयात्रे’तून जीवनावश्यक वस्तू व मदत संकलित करून जवळपास दोन लाख रुपयांची मदत गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवली होती. यंदा मात्र मराठवाड्यासह उमरगा व लोहारा तालुक्यात कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून खरीपाचे नुकसान, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, रोजगार, कर्ज, पीकविमा आणि पुढील पेरणी असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत. त्यामुळे यंदाचा उपक्रम केवळ तात्पुरत्या मदतीपुरता मर्यादित न ठेवता पुढील पेरणी हंगामापर्यंत सातत्याने राबविण्याचा निर्णय फाउंडेशनने घेतला आहे.
अभियानाची सुरुवात दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी उमरगा व लोहारा तालुक्यातील शेतकरी प्रतिनिधी, सामाजिक संस्था, अभ्यासक, कार्यकर्ते व संवेदनशील नागरिकांच्या बैठकीने करण्यात येणार आहे. या बैठकीत अभियानाची सविस्तर रूपरेषा, गावपातळीवरील सहभाग आणि विविध संस्था व व्यक्तींच्या समन्वयाबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर दि. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून प्रत्यक्ष गावभेटी व सर्वेक्षणाला सुरुवात केली जाणार आहे.
अभियानाच्या पहिल्या टप्प्यात गावागावांत भेटी देऊन शेतकरी व ग्रामस्थांशी दुष्काळाबाबत थेट संवाद साधला जाईल. शेतकरी संकट नोंदणी फॉर्मच्या माध्यमातून पाणी, चारा, पीक नुकसान, रोजगार, कर्ज, पीकविमा आदी प्रश्नांची माहिती संकलित करून उमरगा व लोहारा तालुक्यांचा दुष्काळ वस्तुस्थिती अहवाल तयार केला जाणार आहे. या अहवालाच्या आधारे संबंधित लोकप्रतिनिधी, महसूल प्रशासन व विविध शासकीय विभागांकडे आवश्यक उपाययोजनांसाठी पाठपुरावा करण्यात येईल.
पाणी व चाऱ्याची गरज असलेली ठिकाणे आणि उपलब्ध साधनांची सांगड घालणे, रोजगार हमी अंतर्गत कामांसाठी पाठपुरावा करणे, गावनिहाय जलस्रोत व जलसंवर्धनाच्या गरजांची नोंद घेणे, श्रमदान व लोकसहभागातून जल व मृदसंधारणासाठी प्रयत्न करणे याचाही अभियानात समावेश आहे. त्यासोबत पीकविमा, शासकीय मदत, कर्ज व विविध योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, संकटग्रस्त शेतकरी व शेतमजूर कुटुंबांसाठी ‘दिलासा’ उपक्रम तसेच कमी पाण्यातील शेती, पीक विविधीकरण आणि उत्पादन खर्च कमी करण्याबाबत कृषी मार्गदर्शन केले जाणार आहे. पुढील खरीप हंगामापूर्वी गरजू शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी लोकसहभागातून ‘पेरणीची शिदोरी’ हा विशेष उपक्रमही राबविण्यात येणार आहे.
अभियानाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी ‘दसरा विवेकयात्रा’ काढण्यात येणार आहे. ही विवेकयात्रा सकाळी उमरगा, दुपारी मुरूम आणि संध्याकाळी लोहारा अशा तीन टप्प्यांत होणार आहे. यात्रेच्या माध्यमातून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गरजू कुटुंबांसाठी किराणा, शिधा, कपडे व इतर जीवनावश्यक वस्तू संकलित करून त्यांचे पारदर्शकपणे वितरण करण्यात येणार आहे.
“हे अभियान केवळ मदत वाटपाचे नसून दुष्काळाची प्रत्यक्ष वस्तुस्थिती शासनापर्यंत पोहोचवणे, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे, उपलब्ध सामाजिक संसाधने गरजूंपर्यंत पोहोचवणे, जलसंवर्धनासाठी लोकसहभाग निर्माण करणे आणि पुढील पेरणी हंगामापर्यंत संकटग्रस्त शेतकऱ्यांसोबत उभे राहणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. आता गरज केवळ सहानुभूतीची नाही, तर प्रत्यक्ष सहभागाची आहे,” असे फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड. शीतल चव्हाण यांनी सांगितले.
उमरगा व लोहारा तालुक्यातील शेतकरी, तरुण, महिला, सामाजिक संस्था, व्यापारी, डॉक्टर, वकील, शिक्षक, कर्मचारी, पत्रकार, उद्योजक तसेच संवेदनशील नागरिकांनी आपला वेळ, श्रम, ज्ञान, कौशल्य अथवा उपलब्ध साधनांच्या माध्यमातून अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
“मागच्या वर्षी अतिवृष्टीत आपण एकत्र आलो, यंदा दुष्काळातही एकत्र उभे राहूया आणि पुढच्या पेरणीपर्यंत आपल्या बळीराजाची साथ सोडू नका,” असे आवाहन अँड. शीतल चव्हाण फाउंडेशनने केले आहे.






