नळदुर्गच्या क्रांती चौकात मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा! आरडाओरड करणाऱ्या दोघांवर नळदुर्ग पोलिसांत स्वतंत्र गुन्हे दाखल!
तुळजापुर प्रतिनिधी:-
सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड करून शांततेचा भंग करणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्या दोघांवर नळदुर्ग पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. याप्रकरणी दोन मद्यप्यांविरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात स्वतंत्रपणे दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास नळदुर्ग येथील क्रांती चौक परिसरात दोघे जण दारूच्या नशेत मोठ्याने आरडाओरड करून गोंधळ घालत होते. रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या नळदुर्ग पोलिसांच्या पथकाला हे दोघे सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करताना दिसून आले.
कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे-
१. बाळ उर्फ सचिन संजय सावंत (वय ३० वर्षे, रा. मराठा गल्ली, नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव)
२. बंटी उर्फ शहाजी शिवाजी मुळे (वय ३४ वर्षे, रा. मराठा गल्ली, नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव)
सदर आरोपींनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या (मदाका) कलम ८५(१) चे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरून (FIR) नळदुर्ग पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींवर स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन हुल्लडबाजी व धिंगाणा घालणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.






