Best News Portal Development Company In India

मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करून अटक करा; धाराशिव जिल्हा काँग्रेसची आक्रमक मागणी, दुष्काळाच्या ‘जीआर’ची केली होळी!

मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करून अटक करा; धाराशिव जिल्हा काँग्रेसची आक्रमक मागणी, दुष्काळाच्या ‘जीआर’ची केली होळी!

​तुळजापूर प्रतिनिधी;-
विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेच्या नावाखाली मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करून मतदारांची नावे वगळल्याचा गंभीर आरोप करत धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत अटकेची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. तसेच, याच वेळी शासनाच्या फसव्या दुष्काळविषयक शासन निर्णयाची (GR) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करून शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची सरसकट मदत देण्याचीही आक्रमक मागणी करण्यात आली.

​निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह-
​निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे घटनात्मक कर्तव्य आहे. मात्र, मागील काही वर्षांत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, आयोग सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा संशय बळावला आहे. अंतर्गत मतभेद सार्वजनिक झाल्याने आयोगाच्या कारभारातील पारदर्शकता संपुष्टात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
​१० महिन्यांत १४ वेळा सहकाऱ्यांचे आक्षेप
​निवेदनानुसार, विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रिया, नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांची नावे वगळणे आणि आयटी प्रणालीचे केंद्रीकरण यांसारखे महत्त्वाचे निर्णय सहकाऱ्यांना विश्वासात न घेता एकतर्फी घेतले जात आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या या मनमानी कारभारावर निवडणूक आयुक्त श्री. सुखबीर सिंग संधू आणि श्री. विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत किमान १४ वेळा अधिकृत आक्षेप नोंदवल्याची माहिती समोर आली आहे.

​मतदार याद्यांतील फेरफार व न्यायालयीन चौकशीची मागणी-
​पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये लाखो मतदारांची नावे हटवण्यात आल्याचा, तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ दरम्यान मतदार यादीत अनियमितता झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगातील कथित गैरप्रकारांबाबत पुरावे सादर केले असून, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी जिल्हा काँग्रेसने केली आहे.

​दुष्काळविषयक शासन निर्णयाची होळी- शेतकऱ्यांना १ लाखाच्या मदतीची मागणी
​आंदोलनादरम्यान शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळविषयक शासन निर्णयाची (GR) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली. या जीआरमधून शासनाची कोणतीही स्पष्टता दिसून येत नसून, एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला. अवर्षणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हेक्टरी १ लाख रुपयांची सरसकट मदत त्वरित जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

​आंदोलनात प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
​हे आंदोलन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश इंद्रसिंह राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीसह-
​प्रमुख पदाधिकारी- राजेंद्र शेरखाने, मलंग शेख, पांडुरंग तात्या कुंभार, प्रशांत पाटील, विलास साळू, खलील सय्यद, ॲड. सय्यद इनामदार, धनंजय राऊत, ॲड. जावेद काझी, अग्निवेश शिंदे, विनोद वीर, आप्पासाहेब शेळके, दयानंद पाटील, सोमनाथ मिश्किन, सिराज मोगल, अमर तागडे, अरविंद बागडे, अर्जुन बिराजदार, पृथ्वीराज देशमुख, महबूब पटेल, काँग्रेसचा बुलंद आवाज तथा तुळजापूरचे नगरसेवक अमोल कुतवळ. काँग्रेस कार्यकर्ते गोविंद डोंगरे मंगरूळ ग्रामपंचायत सदस्य.

​महिला व युवक आघाडी: गोदावरी केंद्रे, मनीषा वाघमारे, मिलिंद गोवर्धन, शिवानंद तोडकर, महेश म्हेत्रे, गणेश पवार, सरफराज काझी, गोरोबा झेंडे, प्रभाकर लोंढे, संकेत पडवळ, फुरखान शेख, आबेदीन कुरेशी, नसीर इनामदार, सईद बागवान, पोपट शिंदे, मोईज सय्यद, भारत काटे, जीवन चौगुले.

​याशिवाय सर्व सेलचे प्रमुख, तालुका कार्याध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला, विद्यार्थी व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी या सर्व प्रकरणांत तातडीने योग्य कारवाई करावी, असा इशारा काँग्रेस पक्षाने दिला आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india