Best News Portal Development Company In India

धुळ्यातील गरोदर नर्तिकेच्या निर्घृण हत्या प्रकरणातील फरार आरोपी कळंब पोलिसांच्या जाळ्यात; होंडा मोबिलो कारसह दोघांना ठोकल्या बेड्या!

धुळ्यातील गरोदर नर्तिकेच्या निर्घृण हत्या प्रकरणातील फरार आरोपी कळंब पोलिसांच्या जाळ्यात; होंडा मोबिलो कारसह दोघांना ठोकल्या बेड्या!

तुळजापूर प्रतिनिधी:-
धुळे जिल्ह्यातील मोहाडीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गरोदर नर्तिकेची निर्घृण हत्या करून मृतदेह जाळल्याच्या धक्कादायक गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपींना कळंब पोलिसांनी अतिशय शिताफीने जाळे रचून ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी मुख्य दोन फरार आरोपींसह गुन्ह्यात वापरलेली होंडा मोबिलो कार देखील जप्त केली असून, आरोपींना धुळे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
​
​दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी धुळे-चाळीसगाव महामार्गावरील नरवाळ (ता. जि. धुळे) येथील वनक्षेत्रातील निर्जन ठिकाणी एका गरोदर महिलेस अमानुष मारहाण करून तिची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचा मृतदेह जाळण्यात आला होता. याप्रकरणी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

​तपासादरम्यान सदर मृतदेह जामखेड कला केंद्रातील नर्तिका पिंकी हनुमंत काटकर (वय ३१) हिचा असल्याचे निष्पन्न झाले. या हत्याकांडात एकूण ६ आरोपींचा सहभाग असून, यापैकी ४ आरोपींना धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) यापूर्वीच अटक करून मोहाडीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मात्र, मुख्य आरोपी फारुख हजू शेख आणि रोहिणी स्वप्निल जाधव हे गुन्ह्यात वापरलेल्या होंडा मोबिलो कारसह फरार झाले होते.

​हॉटेल ७/१२ समोर रचला सापळा
​दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शकील शेख यांना गुप्त बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली की, धुळे हत्या प्रकरणातील फरार आरोपी कळंब येथून केज रोडने जेवणासाठी जाणार आहेत.
​माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शकील शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान बजबळकर, पोलीस अंमलदार अझीझ शेख व महिला पोलीस अंमलदार सपना गिते यांच्या पथकाने केज रोडवरील ‘हॉटेल ७/१२’ समोर अंधारात सापळा रचला. संशयित आरोपी तेथे पोहोचताच पोलिसांनी त्यांना तात्काळ घेरले.
​
​फारुख हजू शेख (वय २९), रा. सुर्डी, ता. केज, जि. बीड (सध्या रा. शेरे गल्ली, कळंब)
​रोहिणी स्वप्निल जाधव उर्फ माधुरी महेंद्र मेघे (वय २६), रा. जामखेड कला केंद्र (मूळ रा. छत्रपती संभाजीनगर)

​पोलिसांनी तत्काळ आरोपींचे फोटो मोहाडीनगर पोलिसांना पाठवून खात्री करून घेतली. तसेच कळंब शहरात बेवारस स्थितीत सोडून दिलेली गुन्ह्यातील होंडा मोबिलो कार (MH 43 AR 4070) देखील जप्त केली.
​
​ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून, २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी त्यांना जप्त केलेल्या वाहनासह मोहाडीनगर (जि. धुळे) पोलिसांच्या पथकाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

​सदर धडाकेबाज कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शकील शेख, सपोनि समाधान बजबळकर, पोहेकॉ महादेव मुंडे, पोहेकॉ अझीझ शेख व मपोअ सपना गिते यांच्या पथकाने केली. कळंब पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india