स्वाधार शिष्यवृत्ती पोर्टल मधील त्रुटी तात्काळ दूर करा; आरपीआय (आठवले) चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!
अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी; मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आरपीआय आक्रमक
तुळजापूर प्रतिनिधी:-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या ‘स्वाधार शिष्यवृत्ती योजने’च्या वेबसाईटमधील तांत्रिक त्रुटी तात्काळ दूर करून पोर्टल पूर्ववत सुरू करावे आणि विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी अतिरिक्त वेळ वाढवून द्यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी धाराशिवचे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाधार शिष्यवृत्ती योजनेचा फॉर्म भरताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गंभीर तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वेबसाईट बंद राहणे किंवा फॉर्म सबमिट न होणे यांमुळे जिल्ह्यातील शेकडो पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. ऐन मोक्याच्या वेळी पोर्टल योग्य प्रकारे चालत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे.
विद्यार्थ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटमधील त्रुटी तातडीने दुरुस्त करून ती सुरळीत चालू करावी आणि फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ वाढवून द्यावा, अशी आग्रही मागणी आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन सादर करताना आरपीआय (आठवले) चे जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष रणजीत गायकवाड, जिल्हा सरचिटणीस सिद्धार्थ ओव्हाळ, युवक जिल्हाध्यक्ष रणजित बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष संदिपान कांबळे, शहराध्यक्ष महादेव भोसले, शहर सरचिटणीस सुवास झेंडे, युवक नेते महादेव भोसले आणि बालाजी माटे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








