Best News Portal Development Company In India

शारदीय नवरात्र उत्सव २०२६: पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून तुळजापूर सुरक्षा व्यवस्थेची पाहणी; कायदा-सुव्यवस्थेसाठी दिल्या कडक सूचना!

शारदीय नवरात्र उत्सव २०२६: पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून तुळजापूर सुरक्षा व्यवस्थेची पाहणी; कायदा-सुव्यवस्थेसाठी दिल्या कडक सूचना!

​तुळजापूर  बातमीदार:-
धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे आगामी ‘श्री शारदीय नवरात्र महोत्सव २०२६’ अत्यंत उत्साहात, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी, यासाठी धाराशिवच्या मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम आणि मा. जिल्हाधिकारी श्री. कीर्तिकिरण पुजार साहेब यांनी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसर, यात्रा क्षेत्र आणि वाहन पार्किंग व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.

​११ ते २५ ऑक्टोबर दरम्यान रंगणार नवरात्रोत्सव
तुळजापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत साजरा होणारा श्री शारदीय नवरात्र महोत्सव २०२६ हा यंदा दिनांक ११.१०.२०२६ ते २५.१०.२०२६ या कालावधीत पार पडणार आहे. या १५ दिवसांच्या काळात महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात दाखल होणार आहेत. भाविकांची संभाव्य मोठी गर्दी लक्षात घेता, कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने विशेष नियोजन आखले आहे.

​मंदिर, पार्किंग व यात्रा परिसराची बारकाईने पाहणी
पाहणी दौऱ्यादरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक रितु खोखर मॅडम आणि जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी मंदिर परिसर, दर्शनाच्या रांगा, यात्रा क्षेत्र, तसेच शहरात येणाऱ्या वाहनांसाठी निश्चित करण्यात आलेल्या पार्किंगच्या ठिकाणांची बारकाईने पाहणी केली. भाविकांना सुलभ व सुरक्षित दर्शन मिळावे, वाहतूक कोंडी होऊ नये आणि सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शक सूचना देऊन नियोजन पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

​प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती-
या पाहणी दौऱ्याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मनोहर पाटील, तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. मांजरे, विविध महसुली अधिकारी, तसेच पोलीस विभागाचे इतर अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.
​लाखो भाविकांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षेसाठी तुळजापूर पोलीस प्रशासन व महसूल विभाग सज्ज झाला असून, उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना पूर्ण करण्यात येत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india